अम्मान : जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळल्याची घृणास्पद, क्रूर चित्रफीत इसिसने प्रसिद्ध केल्यानंतर संतप्त जॉर्डनने इराकी महिला सदस्यासह दोन दहशतवाद्यांना फाशी दिली असून, इसिसने आपल्या वैमानिकाचा बळी घेतल्याबद्दल इसिसवर सूड उगविण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याला इसिसने प्रत्युत्तर दिले असून, जपानवर हल्ला केला जाईल, असे म्हटले आहे. इसिसने वैमानिकाची सुटका करण्यासाठी मागणी करण्यात आलेली इराकी महिला जिहादी साजिदा अल रिशावी व अल काईदा सदस्य झियाद अल करबोली यांना पहाटे ४.०० वाजता फाशी देण्यात आली. जॉर्डनमधील साक्वा तुरुंगाच्या बाहेर इस्लामी कायदा अधिकाऱ्याच्या उपस्थितीत ही फाशीची शिक्षा देण्यात आली. रिशावीवर अम्मान येथील हॉटेलवर २००५ साली तिहेरी बॉम्बहल्ला केल्याचा आरोप होता. इसिसने पिंजऱ्यात कोंडून जाळून ठार मारलेल्या वैमानिकाचे नाव माझ अल कसासबेह असे असून डिसेंबर महिन्यात विमान सिरियात पडल्यापासून तो इसिसच्या ताब्यात होता. या वैमानिकाची सुटका करण्याच्या मोबदल्यात रिशावीला मुक्त करावे अशी इसिसची मागणी होती. जॉर्डनने रिशावीची मुक्तता करण्याची तयारी दर्शविली होती; पण प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आतच इसिसने जॉर्डनचा वैमानिक माझ याला जिवंत जाळून ठार मारले. रिशावीची मुक्तता केल्यास जपानी ओलिसाचीही इसिसकडून मुक्तता करण्यात येणार होती; पण त्याचाही शिरच्छेद करण्यात आला. (वृत्तसंस्था)
वैमानिकाच्या हत्येनंतर दोन जिहादींना फाशी
By admin | Published: February 05, 2015 2:46 AM