मलेशियामध्ये नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेव्हीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या सरावादरम्यान दोन्ही लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झाली. नौदलाची हा सराव मंगळवारी लुमुट येथील रॉयल मलेशियन नेव्ही स्टेडियममध्ये सुरू होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये एक हेलिकॉप्टर दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडकताना दिसत आहे.
ही दोन हेलिकॉप्टर Fennec M502-6 आणि HOM M503-3 होती. पहिले हेलिकॉप्टर क्रॅश होऊन स्टेडियमच्या पायऱ्यांवर पडले तर दुसरे स्विमिंग पूलमध्ये पडले.
मलेशियाच्या नौदलाने या घटनेवर एक निवेदन जारी केले आहे. यात नौदलाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त ३ ते ५ मे दरम्यान होणाऱ्या लष्करी परेडसाठी हे हेलिकॉप्टर तालीम करत होते. नौदलाने या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. या अपघातात ठार झालेले सर्व जण हेलिकॉप्टरचे क्रू मेंबर्स होते. मृतदेह ओळखीसाठी लुमुट एअर बेस हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. ही घटना स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी ९.३२ वाजता घडली.
या घटनेची चौकशी करण्यासाठी प्रशासनाने आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे देशात वारंवार लष्करी हेलिकॉप्टर कोसळण्याच्या घटनांबाबत चिंता वाढली आहे. मागील महिन्यातच, मलेशियाच्या सागरी अंमलबजावणी एजन्सीचे हेलिकॉप्टर बचाव कवायती दरम्यान पुलाऊ अंग्सा, सेलंगोरजवळ क्रॅश झाले.
ही घटना ५ मार्च रोजी घडली होती, यात पायलटसह दोन जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षीही मलेशियामध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर आपत्कालीन लँडिंगदरम्यान क्रॅश झाले होते. मात्र या घटनेत हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुखरूप बचावले.