ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना व त्यांच्या माजी मंत्र्यांवर आणखी दोन हत्या प्रकरणांत सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्या देशात गेल्या काही आठवड्यांत झालेल्या हिंसक निदर्शनांत शेकडो लोक ठार झाले होते. त्या निदर्शनांची धग इतकी वाढली की शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्या बांगलादेश सोडून भारतात रवाना झाल्या होत्या.
१९७१च्या बांगलादेश मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवण्याचा निर्णय शेख हसीना सरकारने घेतला होता. त्याला बांगलादेशच्या जनतेने तीव्र विरोध केला. ढाका येथील मिरपूर भागातल्या लिंटन हसन लालू ऊर्फ हसन व शेर-ए- बांगला या भागातील तारिक हुसैन या दोघांची हिंसाचारादरम्यान हत्या करण्यात आली होती. हसनच्या भावाने १४८ लोकांविरोधात तक्रार दाखल केली होती.
त्यामध्ये शेख हसीना, माजी गृहमंत्री असदुइझमान खान कमाल, माजी पोलिस महानिरीक्षक अब्दुल्ला अल मामून यांचाही समावेश आहे. ४ ऑगस्ट रोजी मिरपूर येथे सुरू असलेल्या शांततामय निदर्शनांत हसन सहभागी झाला होता. मात्र शेख हसीना यांच्या अवामी लिग या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात तो ठार झाला असे या तक्रारीत म्हटले आहे.
तारिक हुसैन याची आई फिदूशी खातून हिने आपल्या मुलाच्या हत्येबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार माजी पंतप्रधान शेख हसीना, माजी रस्तेवाहतूक मंत्री ओबैदुल कादिर आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही अज्ञात व्यक्तींनी तारिक याची ९ ऑगस्ट रोजी गोळ्या घालून हत्या केली होती.
अवामी पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यावरही विविध गुन्हे शेख हसीना यांच्यावर विविध प्रकरणांत आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या त्या भारतात राहात आहेत. मात्र त्यामुळे भारताशी असलेले आमचे संबंध बिघडणार नाहीत, असा सावध पवित्रा बांगलादेशच्या हंगामी सरकारने घेतला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लिंग पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्यावरही विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई करण्यात येत आहे.