ढाका : पाकिस्तानविरुद्ध १९७१ साली झालेल्या स्वातंत्र्यसंग्रामात ‘युद्ध गुन्हे’ करणाऱ्या विरोधी पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांना रविवारी फासावर लटकावण्यात आले. त्यांना फासावर लटकावण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी किरकोळ हिंसाचार केला आणि प्रसारमाध्यमावर हल्ले केले. कट्टरपंथी जमात- ए- इस्लामी सेक्रेटरी जनरल अली अहसान मोहंमद मुजाहिद (६७) आणि बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीचा नेता सलाउद्दीन कादर चौधरी (६६) यांचा त्यात समावेश आहे. या दोघांनाही ढाक्याच्या मध्यवर्ती कारागृहात रविवारी मध्यरात्रीनंतर १२.५५ वाजता फासावर लटकावण्यात आले.त्यांची पुनर्विलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी फाशी टाळण्याचा शेवटचा प्रयत्न म्हणून अध्यक्ष अब्दुल हमीद यांच्याकडे दया याचिका दाखल केली होती; पण शनिवारी सायंकाळी त्यांची दया याचिका अध्यक्षांनी फेटाळून लावताच काही तासांतच त्यांना फासावर लटकावण्यात आले. युद्ध गुन्हेगारीबद्दल दोषी ठरविण्यात आलेले आणि अध्यक्षांकडे दया याचना करणारे हे दोघे पहिलेच गुन्हेगार होते. दुसरीकडे त्यांच्या कुटुंबियांनी त्या दोघांनी दया याचिका सादर केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला.फासावर लटकवण्यासाठी नेताना ते दोघेही शांत होते आणि त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांना एकाच वेळी फाशी देण्यात आली, असे गुन्हे विभागाचे उपायुक्त शेख नजमूल आलम यांनी सांगितले.जमातच्या दोन अन्य नेत्यांना यापूर्वीच फासावर लटकावण्यात आले असून, या संघटनेने सोमवारी राष्ट्रव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले आहे.
दोन विरोधी नेत्यांना अखेर फाशी
By admin | Published: November 22, 2015 11:55 PM