वॉशिंग्टन : एका ग्रह-भ्रूणाशी समोरासमोर महाभयंकर धडक होऊन आजच्या पृथ्वीची उत्पत्ती झाल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. मंगळ किंवा पृथ्वीच्या आकाराचा थेईआ नावाचा ग्रह-भ्रूण आणि ४.५ अब्ज वर्षांपूर्वीची पृथ्वी यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक झाली तेव्हा पृथ्वी केवळ १०० दशलक्ष वर्षांची होती. थेईआ आणि पृथ्वीची धडक झाल्याचे सर्वविदित आहे. मात्र, थेईआ पृथ्वीला चाटून गेल्याचा निष्कर्ष यापूर्वीच्या संशोधनातून काढण्यात आला होता. तथापि, यूसीएलएच्या वैज्ञानिक पथकाने थेईआ पृथ्वीला चाटून गेला नव्हता तर त्याची व पृथ्वीची समोरासमोर धडक झाली होती, असा निष्कर्ष काढला. या निष्कर्षानुसार, ही धडक एवढी भयंकर होती की पृथ्वी आणि थेईआ एकमेकांत सामावले जाऊन नवा ग्रह उदयास आला. हा ग्रह म्हणजे आजची आपली पृथ्वी. विशेष म्हणजे या धडकेतून उडालेला छोटा तुकडा आपण चंद्राच्या रूपाने पाहतो.या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि यूसीएलएचे प्रोफेसर एडवर्ड यंग म्हणाले की, पृथ्वी व चंद्राच्या आयसोटॉप्समध्ये आम्हाला कोणताही फरक दिसला नाही. ठिकाणाचा फरक वगळता रासायनिक आधारावर या दोन्ही खडकांना वेगळे करताच येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. थेईआ हा ग्रह-भ्रूण पृथ्वी आणि चंद्रात पूर्णपणे सामावला गेला. त्यामुळेच आम्हाला पृथ्वी व चंद्र यांच्यात थेईआचे स्वतंत्र असे कोणतेही अस्तित्व दिसत नाही. थेईआ विकसित होत होता व पृथ्वीशी धडक होऊन नष्ट झाला नसता, तर तो स्वतंत्र ग्रह बनला असता. या संशोधनासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा, द डीप कार्बन आॅब्जर्वेटरी व युरोपियन रिसर्च कौन्सिल अॅडव्हॉन्स्ड ग्रँटने अर्थसाहाय्य पुरविले. यंग यांच्या पथकाने केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष सायन्स या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या निष्कर्षातून थेईआ व जुन्या पृथ्वीच्या धडकेने पृथ्वीवरील पाणी नष्ट झाले होते का यासारखे पृथ्वीच्या मुळाविषयीचे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. या धडकेनंतर हजारो वर्षांनी पाण्याने समृद्ध लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता. (वृत्तसंस्था)
दोन ग्रहांची टक्कर होऊन पृथ्वीची निर्मिती?
By admin | Published: February 03, 2016 2:48 AM