बगदाद: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणखी वाढला आहे. इराकची राजधानी बगदादमधील ग्रीन झोनमध्ये पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे. इराकी सैन्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बगदादच्या ग्रीन झोनमध्ये दोन कत्युशा क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती इराकी सैन्यानं दिली आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अमेरिकन दूतावासापासून १०० मीटर अंतरावर हा हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. याआधी ५ जानेवारीदेखील बगदादच्या ग्रीन झोनमध्ये इराण समर्थकांनी कत्युशा क्षेपणास्त्र डागली होती. यातील काही क्षेपणास्त्रं अमेरिकेच्या दूतावासातदेखील पडली. यानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकन दूतावासाच्या परिसरात क्षेपणास्त्र हल्ले झाले. यापैकी एक क्षेपणास्त्र दूतावासापासून १०० मीटर अंतरावर जाऊन पडलं. 'ग्रीन झोनच्या आत दोन कत्युशा क्षेपणास्त्रं कोसळली आहेत. मात्र यात कोणतंही नुकसान झालेलं नाही,' अशी माहिती इराकी सैन्यानं दिली आहे. अमेरिकन दूतावासाजवळ झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही. याआधी बुधवारी इराणनं इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर २२ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केलं. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं ट्रम्प म्हणाले.