नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाला तीन महिने होत नाहीत तोच २००० रुपयांच्या नकली नोटा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. आयएसआय पाकिस्तानात या बनावट नोटा छापत असून, बांगलादेशमार्गे त्या भारतात येत असल्याची बाब उघड झाली आहे. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांनी अलीकडेच या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातून पोलिसांनी ८ फेब्रुवारी रोजी अजीजूर रहेमान (२६) याला अटक केली आहे. त्याच्याकडून २००० रुपयांच्या ४० बनावट नोटा जप्त केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रहेमानशी केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे की, पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयच्या मदतीने या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्या आहेत. दोन हजार रुपयांची एक नोट मिळविण्यासाठी तस्करांना ४०० ते ६०० रुपये द्यावे लागतात. जप्त केलेल्या या नोटांची तपासणी केली असता असे दिसून आले आहे की, नव्या नोटांतील १७पैकी ११ फिचर्सची नक्कल करण्यात आली आहे. नोटांवरील पारदर्शक भाग, वॉटरमार्क, अशोक स्तंभ, आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी, देवनागरीत लिहिलेली नोटेची किंमत आदींची नक्कल करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला असलेले चंद्रयान, ‘स्वच्छ भारत’चा लोगोही या नोटांवर आहे. या बनावट नोटांची पेपर आणि छपाईची गुणवत्ता मात्र सुमार आहे. असे असले तरी, साध्या डोळ्यांनी या नोटा ओळखणे कठीण आहे. या नोटा आगामी काळात बाजारात येतील अशी भीती एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रथम बनावट नोटा सीमेवर पकडल्या गेल्या होत्या. २२ जानेवारी आणि ४ फेब्रुवारी रोजी या प्रकरणात तक्रार दाखल झाली होती. पीयारुल शेख (१६) आणि दिगंबर मंडल (४२) यांना मालदातून एनआयएने पकडले होते. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, नव्या नोटेत सुरक्षेबाबत आणखी फिचर्स हवे होते. पण, नव्या नोटा छापण्यासाठी तेवढा वेळ नसल्याने असे करता आले नाही. २०१६मधील एका अभ्यासानुसार देशात ४०० कोटींच्या बनावट नोटा चलनात होत्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दोन हजारांच्या बनावट नोटांची पाकमध्ये छपाई?
By admin | Published: February 14, 2017 12:29 AM