नायजेरियाच्या दक्षिण-पूर्व भागात काही अज्ञातांनी पोलीस आणि लष्कराच्या इमारतीवर बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. थेट जेलवरच हल्ला केला. या गोळीबार आणि हल्ल्यानंतर या ठिकाणी असलेल्या जेलमधून एकाच वेळी तब्बल दोन हजार कैद्यांनी पलायन केल्याची घटना घडली आहे. तसेच या हल्ल्यामध्ये काही अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी हा हल्ला ओवेरी शहरात झाला.
अज्ञातांकडून जवळपास दोन तासांहून अधिक वेळ जोरदार गोळीबार सुरू होता. या भयंकर हल्ल्यामध्ये सरकारी इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी मशीन गन, ग्रेनेड आणि आयईडीने हल्ला केला आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र या भीषण हल्ल्यासाठी फुटीरतावादी गट जबाबदार असल्याचं पोलीस महानिरीक्षकांनी म्हटलं आहे.
नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी सध्या प्रकृतीच्या कारणास्तव दोन आठवड्यांसाठी लंडनमध्ये आहेत. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये जेलचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच कमीतकमी 12 सुरक्षा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या घटनेनंतर जवळच्या दोन शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अजब पाकिस्तान! सोशल डिस्टंन्सिंगचे नियम मोडले; 20 जणांना एकाच तुरुंगात डांबले
पाकिस्तानमधील फालिया शहरातून जवळपास 20 जणांना कोरोना संसर्ग टाळण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पकडण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांना एकाच तुरुंगात डांबण्यात आलं. विशेष म्हणजे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन न केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. लोकांन जेलमध्ये डांबून ठेवल्याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानी पोलिसांनी केलेल्या या कारवाईची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. सोशल डिस्टंसिंगचा नियम तोडला या आरोपाखाली सर्वांना अटक करण्यात आली पण सर्व आरोपींना एकाच जेलमध्ये डांबून पोलीस कशाप्रकारे नियम पाळत आहेत असा सवाल लोकांनी विचारला आहे.