बैरूत : लेबनॉनची राजधानी बैरूतमधील विमानतळावर तब्बल दोन टन अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या तस्करीप्रकरणी सौदीचा युवराज व इतर चार जणांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांचा एवढा प्रचंड साठा उजेडात येण्याची बैरूतच्या रफिक हरीरी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सौदीचे युवराज अब्देल मोहसेन बिन वालिद बिन अब्दुल अझीज यांच्या खासगी विमानात हा साठा आढळून आला. युवराज अब्देल मोहसेन याच विमानाने सौदी अरेबियाला जाणार होता. सुरक्षा अधिकाऱ्यांनी विमानाची तपासणी केली असता अमली पदार्थांचे ४० पॅकेज आढळून आले असून त्यांचे वजन सुमारे दोन टन आहे. या पदार्थांत काही प्रमाणात कोकेनचादेखील समावेश आहे, असे वृत्त स्थानिक टीव्हीने दिले आहे. सौदी युवराजासह पाच जण अटकेत असून युवराजाला चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेण्यात आले आहे. उर्वरित चार सौदी नागरिक विमानतळावर असून सीमा शुल्क विभागाचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. या सर्वांवर अमली गोळ्या (कॅप्टागॉन) आणि कोकेनच्या तस्करीचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले. पश्चिम आशियातील लढवय्ये नशेसाठी या गोळ्यांचे सेवन करतात. (वृत्तसंस्था)शाही परिवारातीलसदस्यांचे यापूर्वीही अनेकदा कारनामे1 आपल्या सदस्यांच्या कारनाम्यामुळे सौदीच्या राजघराण्याचे विविध देशांतील प्रशासनाशी यापूर्वीही तंटे झाले आहेत. गेल्या महिन्यात अमेरिकेत एका महिलेवर बळजबरी केल्याच्या आरोपावरून सौदीच्या दुसऱ्या एका युवराजाला अटक करण्यात आली होती. बेव्हर्ली हिल्स येथे ही घटना घडली होती. मात्र, पुराव्याअभावी खटला न चालविण्याचा निर्णय अमेरिकी प्रशासनाने घेतल्याने हे प्रकरण थंड्या बस्त्यात गेले. 2 २०१३ मध्येही एका युवराजावर केनियन महिलेस गुलाम म्हणून ठेवल्याचा आरोप झाला होता. मात्र, नंतर हे आरोप लगोलग वगळण्यात आले. 3 सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजिज यांच्या मुंलाच्या वाहनताफ्यामुळे हजयात्रेत चेंगराचेंगरी झाल्याचा दावा एका वृत्तात करण्यात आला होता. हे वृत्त लेबनानी दैनिकाने प्रसिद्ध केले होते.
विमानात दोन टन अमली पदार्थांचा साठा; सौदीच्या युवराजाला अटक
By admin | Published: October 27, 2015 11:28 PM