अमेरिकेतल्या (America) टेक्सासमधल्या (Texas) दल्लासमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. एअर शो (Air Show) दरम्यान दोन लढाऊ विमाने एकमेकांवर आदळली. या अपघातानंतर दोन्ही विमानांना आग लागली. माजी सैनिक दिनानिमित्त एअर शोचे आयोजन करण्यात आले होते.
बी-17 फ्लाइंग फोर्ट्रेस विमानात पाच क्रू सदस्य आणि पी-63 किंग कोब्रा विमानात एक व्यक्ती होती, असे अपघातग्रस्त विमानाची मालकी असलेल्या कॉमेमोरिटिव्ह एअर फोर्सचे प्रवक्ते लियाह ब्लॉक यांनी सांगितले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
एअर शो दरम्यान, ही घटना शनिवारी दुपारी 1.20 च्या सुमारास शहराच्या मुख्य भागापासून 16 किमी अंतरावर असलेल्या दल्लास एक्झिक्युटिव्ह विमानतळावर घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 40 हून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.
घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. या दुर्घटनेत सर्वच्या सर्व 6 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या अनेक व्हिडीओंमध्ये दोन विमाने हवेत एकमेकांवर आदळताना दिसत आहेत. दोन्ही विमाने आकाशात एकमेकांवर आदळली आणि स्फोट झाला.
दरम्यान, FAA आणि राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाने अपघाताची चौकशी सुरू केली आहे. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन मंत्र्यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. एअर शोमध्ये एवढी मोठी चूक कशी झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.