रशिया आणि युक्रेन यांच्यात जवळपास दीड वर्षांपासून युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातही युद्ध पेटले आहे आणि आता चीनही तिसरी आघाडी उघडण्याच्या तयारीत दिसत आहे. चीनने तैवानजवळ तब्बल 43 लष्करी विमाने आणि 7 जहाजे पाठविली आहेत. यावर चीन आपल्यावर दबाव टाकण्यासाठी हे सर्व करत आहे. मात्र आपण झुकणार नाही, असे तैवानने म्हटले आहे.
चीनच्या 37 विमानांनी तैवानच्या आखाताची सीमा ओलांडल्याचे तैवानचे म्हणणे आहे. तर आपल्याला ही सीमाच मान्य नसल्याचे चीनने म्हटले आहे. खरे तर, एक चीन धोरणांतर्गत तैवान आपलाच भाग आहे, असा चीनचा दावा आहे. मात्र, तैवान स्वतःला एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश मानतो.
चीन तैवानच्या सीमेवर अनेक वेळा लढावू विमाने उडवत असतो आणि लष्करी सरावही करत असतो. एवढेच नाही, तर चीनची लढावू विमाने अनेकवेळा तैवानच्या हवाई हद्दीतही जातात. ड्रॅगन तैवानवर दबाव टाकण्यासाठी असे करतो, असे जाणकारांचे मत आहे. नुकतेच, तैवानला आपल्यापासून वेगळे करण्याचा कुणी प्रयत्न केला, तर त्याला परिणाम भोगावे लागतील, असे चिनी लष्कराचे दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी जनरल झांग योशिया यांनी म्हटले होते.
नुकतेच, अमेरिका आणि ब्रिटनच्या उच्च मंत्र्यांनी तैवानला भेट दिली होती. या भेटीमुले चीनचा तिळपापड झाला होता. एवढेच नाही, तर अमेरिकन संसदेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केला, तेव्हाही चीनने विमाने उडवली होती. सध्या चीनच्या कारवायांवर तैवानचे बारीक लक्ष आहे. त्यांनीही जेट फायटर अॅक्टिव्ह केले असून सीमेवर जहाजेही पाठवली आहेत. याशिवाय कुठल्याही परिस्थितीला प्रत्युत्तर देता यावे यासाठी क्षेपणास्त्र यंत्रणाही सतर्क करण्यात आली आहे.