ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. १४ - कुत्रा इमानी प्राणी आहे. मालकाप्रती त्याच्या निष्ठा अत्यंत प्रामाणिक असतात. वेळ पडल्यास मालकासाठी तो आपले प्राण द्यायलाही मागेपुढे पाहत नाही. अमेरिकेत कुत्र्याच्या निष्ठेचे असेच एक उदहारण समोर आले आहे. जिथे मालकाच्या सात वर्षाच्या मुलीला वाचवण्यासाठी कुत्र्याने सापाचा दंश स्वत:वर ओढवून घेतला.
अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील एका घरात बुधवारी ही घटना घडली. जर्मन शेपर्ड जातीचा दोन वर्षांचा हॉस मॉली डील्युसा या मुली बरोबर घराच्या मागच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी रॅटलस्नेक जातीचा साप घरात घुसला. साप मॉलीच्या दिशेने चालून गेला. हॉसने ते पाहिले. साप मॉलीला दंश करणार इतक्यात हॉसने उडी घेतली तो साप आणि मॉलीच्या मध्ये जाऊन उभा राहिला.
रॅटलस्नेकने हॉसला तीनवेळा दंश केला. हॉस या दंशाने जखमी झाला असून, त्याच्या किडनीचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर हॉसला वाचवण्यासाठी आतापर्यंत ३३ डॉलर्सची मदत जमा झाली आहे. डील्युसा कुटुंबाने दोन महिन्यांपूर्वी हॉसला आपल्या घरी आणले होते.