नवी दिल्ली: संयुक्त अरब अमिरातकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'झाएद पदका'नं सन्मान करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान दिला जाणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील संबंध एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले. यामध्ये मोदींचा मोठा वाटा असल्यानं त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद यांनी ट्विट करुन दिली. याआधी महाराणी एलिजाबेथ, जॉर्ज डब्ल्यू बुश, व्लादिमीर पुतिन, निकोलस सरकोजी, क्षी जिनपिंग आणि अँजेला मर्केल यांना 'झाएद पदका'नं गौरवण्यात आलं आहे. संयुक्त अरब अमिरातकडून दिलं जाणारं 'झाएद पदक' बहुतांशवेळा पी-5 देशांच्या प्रमुखांना दिलं गेलं आहे. पी-5 मध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश होतो. मात्र आता या राष्ट्रप्रमुखांच्या यादीत मोदींच्या नावाचा समावेश झाला आहे. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाल्यानं हा सन्मान मोदींना दिला जात असल्याचं यूएईनं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही देशांमधील व्यापारी आणि सामरिक संबंध अधिक घनिष्ठ झाले आहेत. विविध क्षेत्रांमधील सहकार्यदेखील वाढीस लागल्याचा उल्लेख यूएईनं केला आहे. याआधी फेब्रुवारीत मोदींचा सेऊल शांतता पुरस्कारानं गौरव करण्यात आला. दक्षिण कोरियाकडून हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानं सन्मानित होणारे ते पहिले भारतीय ठरले. आर्थिक आणि ऍक्ट ईस्ट धोरणांसाठी दक्षिण कोरियाकडून मोदींचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे 130 कोटी देशवासीयांचा सन्मान असल्याची भावना मोदींनी बोलून दाखवली होती. संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान आणि बान की मून यांचा मोदींआधी हा पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता.