कोरोनाचe (Coronavirus) नवीन आणि अधिक संसर्गजन्य व्हेरिअंट ओमायक्रॉन (Omicron Variant) समोर आल्यानंतर ब्रिटनमधील परिस्थिती बिघडत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ब्रिटनमध्ये यादरम्यान दररोज १ लाखांच्यावर नव्या रुग्णांची भर पडत आहे. ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. दरम्यान, ब्रिटीश नियामकांनी ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी Pfizer ची कोविड-19 लस वापरण्यास मान्यता दिली आहे.
हा निर्णय ब्रिटनने अशा वेळी घेतला आहे जेव्हा तेथील सरकारने संक्रमित लोकांसाठी आवश्यक आयसोलेशनचा कालावधी कमी केला आहे. ब्रिटनच्या मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA) ने सांगितलं की, फायझर-बायोएनटेकची लस ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी 'सुरक्षित आणि प्रभावी' असल्याचे आढळून आल्यानंतर त्याचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. या वयोगटातील मुलांना धोका कमी असल्याचे सिद्ध करणारे पुरावे मिळाले असल्याची माहिती ब्रिटीश नियामक एमएचआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी जून रेन यांनी दिली.
ओमायक्रॉनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी, ब्रिटन लसीच्या बूस्टर डोससाठी मोहीम तीव्र करण्याची तयारी करत आहे. ब्रिटनने बुधवारी लसीच्या तिसऱ्या डोसच्या 30 दशलक्ष डोसचा टप्पा ओलांडला. या वर्षाच्या अखेरीस सर्व प्रौढांना लसीचे अतिरिक्त डोस उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. काही दिवसांपूर्वीच ब्रिटनने कोरोनाची लागण झालेल्या लोकांसाठी सेल्फ आयसोलेशनचा कालावधी १० दिवसांवरून सात दिवसांवर आणण्याचा निर्णय घेतला होता.