ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 9 - ब्रिटनमधील संसदीय निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल त्रिशंकू अवस्थेत असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासाठी सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल निराशजनक ठरण्याची शक्यता आहे. कारण त्यांची कन्झर्व्हेटिव्ह पार्टी अद्यापपर्यंत बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही.
आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, कन्झर्व्हेटिव्ह पार्टीला 313 जागा मिळाल्या आहेत. तर लेबर पार्टीला 260 जागांवर विजय मिळाला आहे. तर लिबरल डेमोक्रॅटिसला 12, एसएनपीला 35 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा हा 326 जागांचा आहे. या निवडणुकीत कन्झर्व्हेटिव्ह आणि एसएनपी पार्टीला जागांच्या नुकसानीचा परिणाम सहन करावा लागत आहे.
दरम्यान, थेरेसा मे यांच्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला 326 जागा मिळू शकतील, असा अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला होता. 2015 मधील आकडेवारीशी तुलना करता या जागा कमी असतील. 2015 मध्ये 331 जागा कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने जिंकल्या होत्या. विरोधी नेता जेर्मी कोबिन यांना गेल्या निवडणुकीमधील मिळालेल्या 232 च्या तुलनेत यावेळी 266 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
युके इंडिपेंडन्स पक्षाचा (युकेआयपी) सुपडा साफ होईल असाही अंदाज व्यक्त होत आहे. एक्झिट पोलनुसार युके इंडिपेंडन्स पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही, तर दुसरीकडे स्कॉटिश नॅशनल पक्षाला 34 जागांवर विजय मिळू शकतो. लिबरल डेमोक्रेट्सला 14 आणि ग्रीन पार्टीला एका जागेवर समाधान मानावं लागेल.
दरम्यान, ब्रिटनमध्ये स्थिरता येणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया थेरेसा मे यांनी निकाल येण्यापूर्वी दिली होती. तर दुसरकीकेड विरोधी पार्टी लेबर चे नेता जेरेमी कॉर्बिन यांनी म्हटले आहे की, राजकारण बदलल आहे आणि हेच लोकं सांगत आहेत. माझ्या अपेक्षेनुसार मतदान झाले आहे. पंतप्रधानांनी निवडणुकीची घोषणा केली कारण त्यांना जनादेश हवा होता, आणि त्यांचा पराभव हा जनादेश आहे. कॉर्बिन यांनी यापूर्वी असाही दावा केला होता की, लेबर पार्टी ब्रिटनच्या राजकारणाचा चेहरा बदलेल.
थेरेसा मे या 60 वर्षांच्या असून डेव्हीड कॅमेरून यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. 1997 पासून त्या मेडनहेड मतदारसंघातून ब्रिटीश संसदेत निवडून जातात. पंतप्रधानपदाची धुरा सांभाळण्यापुर्वी त्या होम सेक्रेटरी पदावरती कार्यरत होत्या. त्यापूर्वीही त्यांनी विविध पदांवरती काम केले होते. थेरेसा मे यांना निवडणुकीत आव्हान आहे ते 68 वर्षांचे जेरेमी कॉर्बिन यांचे. कॉर्बिन हे लेबर पक्षाचे प्रमुख असून हर्मन हॅरिएट यांच्यानंतर त्यांची विरोधीपक्षनेते पदावर नियुक्ती झाली.
जेरेमी इस्लिंग्टन नॉर्थ या मतदारसंघातून संसदेत निवडून जातात. डेव्हीड कॅमेरुन आणि थेरेसा मे या दोघांच्याही पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये जेरेमी यांनी सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर प्रखर टीका केली होती. पंतप्रधान आणि विरोधीपक्ष नेते यांच्यामधील प्रश्नोत्तरे आणि प्रत्युत्तरांची जुगलबंदी माध्यमांमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली होती.