ब्रिटनमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या पंतप्रधान पदाची निवड आज संपली आहे. अनिवासी भारतीय उद्योजक ऋषी सुनक यांचा पराभव करून लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान बनल्या आहेत.
ऋषी सुनक(Rishi Sunak) आणि लिझ ट्रस(Liz Truss) यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिला होता. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याचा वाद उफाळून आला होता. यामुळे सुनक यांच्यासह जवळपास ५० जणांनी राजीनामा देत बंड पुकारले होते. यात सरकारचे मंत्रीदेखील असल्याने जॉन्सन यांनी अखेर राजीनामा दिला होता. यानंतर नवा पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली होती.
कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा नवा नेता निवडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सुनक आणि ट्रस यांच्यात चुरस होती. देशात रोजगार संकट, औद्योगिक अशांतता आणि मंदीचा सामना करत असताना देशाची सत्ता हाती घेण्यास लिझ तयार आहेत. टीव्ही डिबेटमध्ये सुनक त्यांच्या खूप मागे पडले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान, ऋषी सुनक हे देशातील समस्यांबाबत जनतेवर फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत तर कंझर्व्हेटिव्ह पक्षातील त्यांच्या प्रतिस्पर्धी लिझ ट्रस या ते करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.
लिझ ट्रस यांना 81,326 मते मिळाली, तर ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली, तर मतदानाची टक्केवारी 82.6 टक्के होती.