UK General Elections 2024 : ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीची(लोकसभा निवडणूक) तारीख जाहीर झाली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी स्वतः तारखेच्या घोषणेसह संसद लवकरच विसर्जित केली जाईल, असे सांगितले. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर पीएम सुनक यांनी ही घोषणा केली. दरम्यान, निवडणुकीच्या घोषणेनंतर सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष अडचणीत आला आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी सुनक यांची साथ सोडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 78 सदस्यांनी सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर देशात नवीन सरकार स्थापन होईल. पण, या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमोर अनेक अडचणी आल्या आहेत. निवडणुकीत पराभव होईल, या भीतीने त्यांच्या पक्षाच्या खासदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यामुळे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या अनेक ज्येष्ठ खासदारांनी पक्ष सोडण्यास सुरुवात केली आहे.
बडे-बडे नेते निवडणुकीच्या मैदानातून पळून गेलेब्रिटीश मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत सुनक यांच्या पक्षाच्या 78 खासदारांनी पक्ष सोडला असून त्यांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत दारुण पराभवाची भीती या खासदारांना वाटत असल्यानेच ते निवडणुकीपासून दूर राहिल्याचे मानले जात आहे. माजी पंतप्रधान थेरेसा मे आणि माजी संरक्षण मंत्री बेन वॉलेस यांच्यासारख्या दिग्गजांनीही निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढला आहे. त्यामुळे आता ऋषी सुनक यांचा पक्ष पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आता बऱ्यापैकी कमी झाली आहे.
सुनक यांच्या विरोधाक कोण?ब्रिटनमधील दोन प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक म्हणजे ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष आणि दुसरा कीर स्टाररचा मजूर पक्ष. कंझर्व्हेटिव्ह पक्ष सलग 14 वर्षे सत्तेत असून, गेल्या 2 वर्षांपासून पक्षाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पक्षाविरोधात देशभरात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्यामुळे सुनक यांच्यासाठी ही निवडणूक खुप कठीण असल्याचे मानले जात आहे.