Russia Ukraine War: युक्रेनबाबत भारताच्या भूमिकेवर ब्रिटन नाराज! निधी रोखण्याची पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 08:10 PM2022-03-04T20:10:15+5:302022-03-04T20:12:20+5:30
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियाविरोधात अनेक निर्बंध लादण्याची भूमिका पाश्चिमात्य देशांनी घेतली आहे.
लंडन-
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धातरशियाविरोधात अनेक निर्बंध लादण्याची भूमिका पाश्चिमात्य देशांनी घेतली आहे. रशियानं युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. भारतानं मात्र यात तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे ब्रिटननं नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिटनचे खासदार आता भारतानं रशियाविरोधात मतदान न केल्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडे भारताविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
ब्रिटनचे खासदार जॉनी मर्सर यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याकडे भारताला दिला जाणारा ५० मिलियन पाऊंडहून अधिक परदेशी सहाय्यता निधी तात्काळ थांबविण्यात यावा अशी मागणी केली असल्याचं वृत्त 'द इंडिपेंडन्ट'नं दिलं आहे. भारतानं रशियाविरोधात मतदान करण्यास नकार दिला. त्यामुळे भारताला मिळणारा परदेशी निधी बंद करावा असं जॉनी मर्सर यांनी म्हटलं आहे.
In 2021/22 we are giving £55.3m to India in Foreign Aid. I am a strong supporter of foreign aid and voted against this Government’s reduction of it.
— Johnny Mercer (@JohnnyMercerUK) March 3, 2022
However if we sanction Putin’s mates, it’s time to end this donation too. Far worthier causes around. https://t.co/BW3mcx3xBZ
"निधी बंद करण्याची वेळ आली"
भारताला केलं जाणारं अर्थसहाय्य तातडीनं बंद करावं लागेल यामागे अनेक कारणं आहेत, असं मर्सर म्हणाले. "परदेशी सहाय्यता निधी म्हणून भारताला ५५.३ मिलियन पाऊंड दिले जात आहेत. मी परदेशी निधी सहाय्यतेचा मोठा समर्थक आहे आणि सरकारकडून यात घट करण्याविरोधातही मी मतदान केलं आहे. पण जर आपण पुतीन समर्थकांविरोधात कडक निर्बंध लावण्याचा विचार करत असू तर या निधीवरही बंदी घालण्याची वेळ आली आहे", असं जॉनी मर्सर यांनी म्हटलं आहे.
रशियाने दिले प्रत्युत्तर
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ९व्या दिवशीही सुरूच आहे. युद्धानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. मात्र, आता रशियानेही पलटवार केला आहे. रशियाने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. रशियाने अमेरिकेला रॉकेट इंजिनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियन स्पेस एजन्सी रोसकॉसमॉसचे प्रमुख दिमित्री रोगोझिन यांनी ही माहिती दिली.