येत्या काही दिवसांतच ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत, पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नेतृत्वाखाली कंझर्व्हेटिव्ह पक्षाने पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, या निवडणुकीत विरोधी पक्षाचा वरचष्मा असल्याचे निवडणूक रणनीतीकार सांगत आहेत. दरम्यान, शनिवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पत्नी अक्षता मूर्तीसह लंडनमधील एका हिंदू मंदिराला भेट दिली. श्री स्वामीनारायण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर, सुनक यांनी हिंदू धर्माबद्दल प्रतिक्रिया दिली.
ऋषी सुनक म्हणाले की, हिंदू धर्म माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे. धर्माने नेहमीच मार्गदर्शन केले आहे. मग ते वैयक्तिक जीवन असो वा सार्वजनिक जीवन. जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात धर्म हा माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे.
सुनक म्हणाले, "मी एक हिंदू आहे आणि तुमच्या सर्वांप्रमाणेच मला माझ्या धर्मावरील विश्वासातून प्रेरणा मिळते. श्रीमद भगवद गीता शपथ घेऊन खासदार झाल्याचा मला अभिमान आहे. मला हिंदू असल्याचा अभिमान आहे, असंही सुनक म्हणाले.
ऋषी सुनक म्हणाले, "आपला विश्वास आपल्याला आपले कर्तव्य बजावण्यास शिकवतो आणि जोपर्यंत कोणी ते प्रामाणिकपणे करतो तोपर्यंत परिणामांची चिंता करू नये. हीच गोष्ट मला नेहमीच प्रेरणा देते. माझ्या पालकांप्रमाणेच मीही माझे जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करतो.
ऋषी सुनक यांना भारतीयांची मते मिळतील का?
ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरही देशाचे पहिले हिंदू पंतप्रधान ऋषी सुनक आपल्या पदावर कायम राहतील का? ब्रिटनमध्ये राहणारे हिंदू ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला मतदान करतील का? मजूर पक्षालाही भारतीयांची मते मिळतील का? अर्थात हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ब्रिटनच्या २०११ च्या जनगणनेनुसार, भारतीय वंशाचे सुमारे १५ लाख लोक आहेत, जे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या २.५ टक्के आहेत. ब्रिटनमधील सर्वात मोठा स्थलांतरित समूह भारतीय आहे. इतर स्थलांतरित गटांच्या तुलनेत ते तुलनेने चांगले शिक्षित आहेत. भारतीयांना ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत लोक मानले जातात. हिंदुजा, लक्ष्मी मित्तल, स्वराज पाल यांसारख्या भारतीय वंशाच्या भारतीयांना ब्रिटनच्या श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळाले आहे.