नवी दिल्ली: कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटने जन्म घेतल्याने संपूर्ण जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन एकाचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे मृत्यू झालेल्या जगभरातील पहिल्या रुग्णाची नोंद आता झाली आहे.
बोरिस जॉन्सन म्हणाले की, दररोज ओमायक्रॉनची लागण झालेल्या शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे. त्यातच आज कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे ३० पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.
दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं अनेक देशांची चिंता वाढवली आहे. जगभरात वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत वैज्ञानिकांनी पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कंसर्न श्रेणीत टाकलं आहे. आता या नव्या व्हेरिएंटवर UK च्या वैज्ञानिकांनी एक स्टडी केली आहे. ज्याचा खुलासा धक्कादायक आहे.
या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जर सुरक्षेचे अतिरिक्त उपाय केले नाही तर पुढील वर्षाच्या एप्रिल महिन्यापर्यंत कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे २५ हजार ते ७५ हजार मृत्यू होऊ शकतात. लंडनच्या स्कूल ऑफ हाइजीन एंड ट्रॉपिकल मेडिसिन आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्टेलनबोश यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.
लहान मुलांसाठी धोकादायक-
ब्रिटिश एक्सपर्टनुसार, ओमायक्रॉन व्हेरिएंट प्रत्येकासाठी एक मोठं आव्हान आहे. दक्षिण आफ्रिका आणि UK डेटानुसार, हा व्हेरिएंट लहान मुलांसाठी धोकादायक आहे. आता तो लहान मुलांमध्ये पसरत आहे. त्यांच्यात मध्यम ते गंभीर लक्षणं पाहायला मिळत आहे. याआधी कोरोनाचे जितके व्हेरिएंट आढळले तेव्हा मुलांमध्ये सौम्य किंवा काहीच लक्षणं आढळली नाही. ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकतात असं डॉक्टरांनी सांगितले आहे.