युक्रेन : आतापर्यंत १४३ बालकांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 06:29 AM2022-03-29T06:29:15+5:302022-03-29T06:29:50+5:30
२१६ मुले जखमी; मृतांची संख्या वाढण्याची भीती, निवासी भागांचेही मोठे नुकसान
कीव्ह : रशियाने सुरू केलेल्या युद्धात युक्रेनमध्ये आतापर्यंत १४३ बालकांचा मृत्यू झाला असून, २१६ जण जखमी झाले आहेत. या संख्येमध्ये नजीकच्या काळात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रशियाने युक्रेनमधील कीव्ह, लविव्ह, खारकीव अशा अनेक शहरांतील लष्करी ठिकाणांबरोबरच निवासी भाग, तसेच शाळा, रुग्णालयांवरही बॉम्बहल्ले केले आहेत. त्यात काही हजार नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यांचा अमेरिका, युरोपसह अनेक देशांनी तीव्र निषेध केला आहे. मात्र, त्याची पर्वा न करता, रशियाने अद्याप युद्ध सुरूच ठेवले आहे.
बॉम्बहल्ले करून बालकांनाही ठार मारणाऱ्या रशियाचा युक्रेनमधील लविव्ह शहरामध्ये मध्यंतरी आगळ्या पद्धतीने निषेध करण्यात आला होता. लविव्ह येथील एका चौकात १००हून अधिक रिकाम्या बाबागाड्या ठेवण्यात आल्या व युक्रेनच्या नागरिकांनी मूक निषेध केला होता. रशियाच्या हल्ल्यात अनेक निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. मोठ्या शहरांतील आणि उपनगरांतील इमारतींना रशियाच्या सैन्याने लक्ष्य केले आहे.
युक्रेनची फाळणी करण्याचा डाव?
कोरियाचे उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया असे विभाजन झाले आहे. त्या धर्तीवर युक्रेनचे पूर्व युक्रेन व पश्चिम युक्रेन अशी फाळणी करण्याचा डाव रशियाने रचल्याचा दावा युक्रेन लष्कराच्या गुप्तचर विभागाने केला आहे. रशिया आपल्या सीमेपासून क्रिमियापर्यंत लँड कॉरिडॉर बनविण्याच्या प्रयत्नात आहे, असेही युक्रेनने म्हटले आहे.
‘पुतिन यांच्या अटींपुढे झुकणार नाही’
n रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी घातलेल्या अटींपुढे झुकणार नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
n शांतता प्रस्थापित करण्यासाठी अत्यंत तटस्थ पद्धतीने चर्चा होणे व त्यात युक्रेनचा सन्मान राखला जाणे आवश्यक आहे, तरच आम्ही शांतता करार मान्य करू, असेही त्यांनी सांगितले.
खारकीव्ह प्राणिसंग्रहालयातील आठ कांगारूंना वाचविले
खारकीव : रशियाने केलेल्या बाॅम्बहल्ल्यात खारकिवमधील फेलामन इको पार्कला आग लागली. या प्राणीसंग्रहालयातील आठ कांगारुंचा जीव वाचविणाऱ्या एका स्वयंसेवकाची जगभर वाहव्वा होत आहे. त्या प्रसंगाचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर झळकला आहे. बॉम्बहल्ल्यांमुळे या प्राणीसंग्रहालयाला आग लागताच तेथील आठ कांगारूंना या स्वयंसेवकाने एका गाडीत घातले व त्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला.
युक्रेनमध्ये युद्धात माणसांनी इतर लोकांचा जीव वाचविल्याची अनेक उदाहरणे गेल्या महिनाभरात पुढे आली आहेत. मात्र, युद्धकाळात एका व्यक्तीने अनेक प्राण्यांचा जीव वाचविणे ही आगळी घटना आहे. युक्रेनमधील सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थेचे प्रमुख ओलकसँड्रा मातविचूक यांनी आठ कांगारुंच्या सुटकेची कहाणी व्हिडिओसह समाजमाध्यमांवर झळकाविली आहे.