किव्ह : युक्रेनमधील युद्धाच्या चौथ्या दिवशी तेथील खार्किव्ह शहर ताब्यात घेण्यासाठी रशियन लष्कर तिथे बॉम्बहल्ले करीत आहे. मात्र, खार्किव्हमध्ये शस्त्रधारी जनता व युक्रेनचे लष्कर रशियाच्या सैनिकांशी कडवी झुंज देत आहेत. रशियाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी बेलारूस येथे एक शिष्टमंडळ पाठविले आहे. त्याच्याशी चर्चा करण्यास युक्रेनने होकार दिल्याचा दावा रशियाने केला आहे.
रशियाच्या फौजांना खार्किव्हवर ताबा मिळविणे अद्याप शक्य झालेले नाही. आपली सरशी होत असल्याचे रशिया म्हणत असला तरी युक्रेनमधील लढाई त्यांच्यासाठी सोपी राहिलेली नाही. खार्किव्हमधील नागरिकांच्या प्रतिकारामुळे रशियाच्या लष्कराने बॉम्बहल्ल्यांचे प्रमाणही वाढविले आहे. या शहरातील निवासी इमारतींवरही हल्ले चढविले जात असल्याचे युक्रेन सरकारने म्हटले आहे.
युक्रेनवर झालेल्या आक्रमणाला बेलारूसने हातभार लावला होता. त्यामुळे त्या देशात जाऊन रशियाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याची आमची तयारी नाही, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी याआधी म्हटले होते. त्यांनी रशियाबरोबरच्या चर्चेसाठी आणखी काही ठिकाणे सुचविली होती. पण, युक्रेनने या बाबतीतली भूमिका आता बदलली आहे. खार्किव्हला रशियाच्या सैनिकांनी वेढा घातला आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियन सैनिकांवर गोळीबार करून त्यांची काही शस्त्रसामग्री नष्ट केल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांत झळकले आहेत.
युक्रेनमधील किव्ह, खार्किव्हसारख्या मोठ्या शहरांमध्ये सरकारने नागरिकांना बंदुका दिल्या आहेत. त्यांच्या साहाय्याने लोक रशियाच्या सैनिकांवर तुटून पडत आहेत. लष्करी अनुभव असलेल्या व देशाकरिता लढू इच्छिणाऱ्या कैद्यांची सरकारने मुक्तता केली. किती कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली, याचा तपशील युक्रेन सरकारने दिलेला नाही. (वृत्तसंस्था)
स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी लढा सुरू
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी सांगितले की, आम्ही आमच्या देशासाठी लढत आहोत. स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा आम्हाला अधिकार आहे. रशियाचे लष्कर युक्रेनमधील निवासी भागांवरही बॉम्बहल्ले चढवीत आहे. त्यामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. – जेलेन्स्की
रशियाच्या अणुप्रतिरोध दलांना सतर्क राहण्याचा पुतिन यांचा आदेश
युक्रेनशी रशियाने सुरू केलेल्या युद्धानंतर नाटो, तसेच इतर पाश्चिमात्य देशांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांचा हा पवित्रा पाहता रशियाच्या अणुप्रतिरोध दलांना सतर्क राहण्याचे आदेश राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत. रशिया व पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला असून, त्यातून अणुयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पुतिन यांनी दिला होता. रशियाने नाटो देशांवर आक्रमण केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे अमेरिकेने बजावले होते. मात्र, युक्रेनमध्ये लष्कर पाठविण्यास अमेरिकेने नकार दिला होता.
पुतिन विनाकारण वाद वाढवत आहेत
रशियाच्या अणुप्रतिरोध दलांना सतर्क राहण्याचा आदेश देऊन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन विनाकारण वाद वाढवत आहेत असे अमेरिकेने म्हटले आहे. पुतीन या युद्धाचे रंगवित असलेले स्वरुप चुकीचे आहे. आम्ही पुतीन यांच्या कारवायांचा कठोरपणे मुकाबला करू. - लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड, अमेरिका राजदूत, संयुक्त राष्ट्र