Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन विरुद्धच्या युद्धाची घोषणा केल्यानंतर युक्रेननं एअर स्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या युद्धाच्या निर्णयामुळे युक्रेनमध्ये येणाऱ्या प्रवासी विमानांना धोका निर्माण होऊ शकतो याच पार्श्वभूमीवर युक्रेननं देशाच्या हवाई मार्गांवर बंदी घातली आहे. याशिवाय प्रवासी विमानांना लक्ष्य करत शूटडाऊन करण्याची भूमिका रशियाकडून घेण्यात येऊ शकते अशी भीती युक्रेनला आहे.
युक्रेनच्या स्टेट एअर ट्राफिक सर्व्हीसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार युद्धाचा धोका लक्षात घेता संपूर्ण युक्रेनच्या हवाई भागात प्रवासी विमानांच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
युरोपच्या हवाई नियामकांनी याआधीच लष्करी कारवायांच्या पार्श्वभूमीवर रशिया आणि बेलारुसच्या सीमेजवळच्या हवाई क्षेत्रातील धोक्याची सूचना दिली होती. त्यातच गुरुवारी एअर इंडियाचं फ्लाइट AI1947 युक्रेनच्या राजधानी कीव येथून दिल्लीत माघारी परतलं आहे. यात अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांसह अनेक भारतीय नागरिक मायदेशात परतले आहेत.