2 Indians died in Russian Army by Ukraine: रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून युद्ध सुरू आहे. या संघर्षात नुकताच दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी या संदर्भात एक निवेदन जारी केले. हे दोन्ही भारतीय नागरिक रशियन सैन्यात भरती झाल्याचे सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने हे प्रकरण रशियाच्या पुढ्यात ठामपणे मांडले आहे आणि रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांची लवकर सुटका करून परतण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, अनेक भारतीय नागरिक रशियन सैन्यात भरती होऊन कर्तव्य बजावत आहेत. रशियाने युक्रेनच्या सीमेवरील काही भागात हे जवान तैनात केले आहेत. त्यांना रशियन सैन्याशी लढण्याच्या कामगिरीवर पाठवले जात आहे. त्यामुळेच परराष्ट्र मंत्रालय आणि मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांची लवकर सुटका करावी अशी भूमिका मांडली आहे. तसेच त्यांना सुखरूप मायदेशी परतण्यासाठी हे प्रकरण नवी दिल्लीतील रशियन राजदूत आणि मॉस्कोमधील रशियन अधिकाऱ्यांकडे जोरदारपणे मांडले असल्याची माहिती आहे.
दरम्यान, रशियन लष्कराकडून आमच्या नागरिकांची होणारी सर्व प्रकारची भरती थांबवावी, अशी मागणी भारताने केली आहे. असे कोणतेही उपक्रम आमच्या भागीदारीशी सुसंगत नसतील. यासोबतच भारताने रशियामध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना रशियामध्ये नोकरी शोधताना काळजी घेण्याची विनंती केली आहे.