युक्रेनचा जोरदार हल्ला, ड्रोन हल्ल्यात रशियाचा एअरबेस उद्ध्वस्त; परिसरात धुराचे लोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 19:43 IST2025-03-20T19:41:56+5:302025-03-20T19:43:53+5:30
युक्रेनने रशियाच्या एंगेल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर ड्रोन हल्ला केला, यामुळे मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे धुराचे आणि ज्वाळांचे लोट उठू लागले.

युक्रेनचा जोरदार हल्ला, ड्रोन हल्ल्यात रशियाचा एअरबेस उद्ध्वस्त; परिसरात धुराचे लोट
रशिया-युक्रेनमध्ये गेल्या काही महिन्यापासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबावे म्हणून अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे, या दोन्ही देशात अजूनही हल्ले सुरू आहेत. युक्रेनने गुरुवारी रशियाच्या एंगेल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर ड्रोन हल्ला केला, यामुळे मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे धुराचे आणि ज्वाळांचे लोट उठू लागले. हा हल्ला युद्ध आघाडीपासून सुमारे ७०० किलोमीटर अंतरावर झाला.
या हल्ल्याबाबत रॉयटर्सने माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये, एअरबेसवर एक मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे. यामुळे आजूबाजूच्या झोपड्या उद्ध्वस्त झाल्या. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालींनी १३२ युक्रेनियन ड्रोन पाडले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एंगेल्स बॉम्बर बेस सोव्हिएत काळातील आहे आणि येथे रशियाचे टुपोलेव्ह टीयू-१६० अणु-सक्षम हेवी बॉम्बर आहेत. युक्रेनियन ड्रोन हल्ल्यानंतर एंगेल्स शहरात आग लागल्याची आणि जवळपासच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची पुष्टी साराटोव्ह प्रदेशाचे गव्हर्नर रोमन बुजार्गिन यांनी केली. त्यांनी एअरबेसचे नाव घेतले नसले तरी, ते या भागातील मुख्य एअरबेस आहे.
एंगेल्स जिल्ह्याचे प्रमुख मॅक्सिम लिओनोव्ह यांनी सांगितले की, तेथे स्थानिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे पण त्यांनी अधिक तपशील दिले नाहीत. युक्रेनने यापूर्वीही एंगेल्स एअरबेसला लक्ष्य केले आहे. डिसेंबर २०२२ मध्ये तिथे ड्रोन हल्ले झाले आणि जानेवारीमध्ये एका तेल डेपोवर हल्ला झाला, यामुळे आग लागली. ही आटोक्यात आणण्यासाठी पाच दिवस लागले.
युक्रेनने समारा प्रदेशातील सिझरान शहरातील तेल शुद्धीकरण कारखान्यावरही ड्रोन हल्ले केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपत्कालीन पथके परिस्थितीला प्रतिसाद देत आहेत पण अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दल वृत्त नाही. रिफायनरीचे किती नुकसान झाले हे त्यांनी सांगितले नाही.