Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला जवळपास दोन आठवड्यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या युद्धातून रशियाला अद्यापही काहीही साध्य झालेलं नाही. परंतु त्यांना आपले दोन मोठे सैन्य अधिकारी मात्र गमवावे लागले आहेत. रशियाला कडवी झुंज देत असलेल्या युक्रेननं आता आणखी एक मोठा दावा केला आहे. रशियाचे मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह (Russian Major General Vitaly Gerasimov) यांना ठार केल्याचा दावा युक्रेननं केला आहे. 'द कीव इंडिपेंडंट'ने युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर संचालनालयाच्या हवाल्याने हा दावा केला आहे. याआधी रशियाच्या आणखी एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला युद्धात ठार केल्याचा दावा युक्रेननं केला होता.
"युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य गुप्तचर विभागाने सांगितलं की, युक्रेनने खारकीवजवळ रशियन मेजर जनरल विटाली गेरासिमोव्ह यांना ठार केलं आहे," असं कीव इंडिपेंडंटनं एका ट्वीटद्वारे म्हटलं. गेरासिमोव्ह हे वरिष्ठ लष्करी अधिकारी होते. त्यांनी दुसऱ्या चेचेन युद्धात भाग घेतला होता आणि क्रिमिया ताब्यात घेतल्याबद्दल त्यांना पदक देऊन गौरवण्यातही आलं होतं. रशियन लष्करी अधिकारी विटाली यांनीही सीरिया युद्धात भूमिका बजावली होती.
युक्रेन सध्या रशियाला कडवी झुंज देतआहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदमीर झेलेंन्स्की यांनी आतापर्यंत रशियाच्या ११ हजारांपेक्षा अधिक जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. तसंच मोठ्या प्रमाणात रशियन युद्ध सामग्रीदेखील नष्ट केल्याचा दावा त्यांनी केलाय.