रशियाच्या अण्वस्त्र प्रमुखाच्या हत्येची जबाबदारी युक्रेनने स्वीकारली, स्फोटात सहाय्यकही ठार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 19:52 IST2024-12-17T19:47:08+5:302024-12-17T19:52:01+5:30
मॉस्कोमधील क्रेमलिन या राष्ट्रपती भवनापासून अवघ्या 7 किमी अंतरावर स्फोट झाला.

रशियाच्या अण्वस्त्र प्रमुखाच्या हत्येची जबाबदारी युक्रेनने स्वीकारली, स्फोटात सहाय्यकही ठार!
मॉस्को : रशियाचे अण्वस्त्र प्रमुख लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांच्यासह त्यांच्या सहाय्यकाचा मंगळवारी मॉस्कोमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. या स्फोटाची जबाबदारी युक्रेनने स्वीकारली आहे.
संरक्षण दलाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांचा मंगळवारी सकाळी येथील निवासी अपार्टमेंट ब्लॉकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. यावेळी, त्याचा सहाय्यकही मारला गेला. मॉस्कोमधील क्रेमलिन या राष्ट्रपती भवनापासून अवघ्या 7 किमी अंतरावर स्फोट झाला.
निवासी अपार्टमेंट ब्लॉकजवळ स्कूटरमध्ये स्फोटके लपवून ठेवण्यात आली होती. याचा स्फोट झाल्याने लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांच्यासोबत त्यांचा सहाय्यकाचा सुद्धा मृत्यू झाला. रशियाच्या तपास समितीने ही माहिती दिली. दरम्यान, युक्रेनने रशियाच्या लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह यांच्या मृत्यूनंतर रशियाच्या संसदेच्या उपसभापतींनी त्यांच्या हत्येचा नक्कीच बदला घेतला जाईल असे म्हटले आहे. दरम्यान, लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह हे गेल्या 4 महिन्यांत शत्रूंना बळी पडलेले तिसरे वरिष्ठ रशियन अधिकारी आहेत.
यापूर्वी रशियन क्षेपणास्त्र तज्ञ मिखाईल शॅटस्की यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. युक्रेनवर डागलेल्या रशियन क्षेपणास्त्रांचे आधुनिकीकरण करण्यात शॅटस्की यांचा सहभाग होता. तर तीन -अडीच महिन्यांपूर्वी मॉस्कोचे कोलिमा शहर ड्रोन विशेषज्ञ कर्नल ॲलेक्सी कोलोमेयेत्सेव्ह मॉस्कोमध्ये मृतावस्थेत आढळले.