लुगान्सक : रशियासमर्थक बंडखोरांनी शनिवारी हल्ला करून युक्रेनियन लष्कराचे मालवाहू विमान पाडले. यात विमानातील ४९ लष्करी कर्मचारी ठार झाले. देशाच्या पूर्व भागामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या बंडखोरीदरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होण्याची ही पहिलीच घटना आहे. युक्रेनियन लष्कराने सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे लुगान्सक औद्योगिक बंदर पुन्हा ताब्यात घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे विमान पाडण्यात आले. बंडखोरांचा गड असलेल्या लुगान्सक शहरातील विमानतळाजवळ हा हल्ला करण्यात आला. विमानावरील हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विमानावर मारा झाल्यानंतर प्रारंभी आकाशात लहान ज्वाळा दिसल्या. विमानावर अवजड मशीनगनमधून मारा करण्यात आला होता. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर त्याचा स्फोट झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनियन लष्कराचे विमान सैनिकांना लुगान्सककडे घेऊन जात होते. ते विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला केला, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. विमानात निमलष्करी दलाचे ४० कर्मचारी व नऊ विमान कर्मचारी होते. ते सर्व जण ठार झाले, असे युक्रेनच्या स्वयंघोषित दहशतवादविरोधी मोहिमेच्या एका प्रवक्त्याने सांगितले. चार इंजिन असलेल्या या विमानातून लष्करी सामग्रीही वाहून नेण्यात येत होती. विमान पाडण्यापूर्वी लुगान्सकमध्ये अनेक तास धुमश्चक्री सुरू होती, असे एका पत्रकाराने सांगितले. (वृत्तसंस्था)
युक्रेनचे विमान पाडले, ४९ ठार
By admin | Published: June 15, 2014 2:59 AM