कीव : युक्रेनमध्ये सहज विजय मिळेल या अविर्भावात गेलेल्या रशियन सैन्याचे पुरते हाल होऊ लागले आहेत. इंधनाअभावी रणगाडे बंद पडू लागले असून जेवणाचेही हाल होत आहेत. अशातच आकाशातून अचानक एक ड्रोन येत आहे आणि रशियन सैन्याची पुरती दाणादाण उडवून जात आहे. कीवच्या आकाशात आधीच एक लढाऊ विमानाचा पायलट रशियन विमानांसाठी काळ ठरलेला असताना तुर्कीने दिलेली अजस्त्र ताकद रशियाचे पुरते कंबरडे मोडत आहे.
तुर्कीच्या टीबीटी २ ड्रोनने युक्रेनला आपली अजस्त्र ताकद दिली आहे. हे ड्रोन रशियाचे टँक आणि चिलखती गाड्यांना भेदत सुटले आहेत. याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. युक्रेन हवाई दलाने या ड्रोनना नवसंजीवनी देणारे असे म्हटले आहे.
युक्रेनच्या दुतावासाने हा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये एका रस्त्यावर दोन्ही बाजुने रशियन फौजांचे रणगाडे आणि वाहने उभी होती. सैनिकही दिसत होते. याचवेळी ड्रोनने त्यांच्या रणगाड्यावर मिसाईल डागून तो उद्धवस्त केला. यामुळे हे रशियन सैनिक बचावासाठी सैरावैरा पळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कीवपासून ६० मैल दूरवरील मल्यन येथील आहे. असाच हल्ला चोरनोबैवकामध्ये देखील करण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. या भागातही भीषण युद्ध सुरु आहे.
तुर्कस्तानने युक्रेनला दोन ड्रोन दिले आहेत. या ड्रोनद्वारे रशियन फौजांवर हल्ले केले जात आहेत. नाटोतील देशांनी युक्रेनला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची रसद देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे रशियाला जेवढे वाटलेले तेवढे हे युद्ध सोपे राहिलेले नाही.