किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 11:17 AM2024-11-21T11:17:11+5:302024-11-21T11:30:22+5:30
Storm Shadow Missile : टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, कुर्स्कमधील मारिनो गावातील रहिवाशांना स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले आहेत.
Storm Shadow Missile : युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. यादरम्यान युक्रेनच्या सशस्त्र दलांनी प्रथमच रशियावर ब्रिटीश बनावटीची स्टॉर्म शॅडो लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली आहेत. टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, कुर्स्कमधील मारिनो गावातील रहिवाशांना स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन प्रशासनाने युक्रेनला रशियाच्या आत लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने निर्मित लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिल्यानंतर लगेचच ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यानंतर आता ब्रिटीश बनावटीची स्टॉर्म शॅडो लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे अत्यंत घातक मानली जातात, कारण ती २५० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करतात.
दरम्यान, युक्रेनच्या सशस्त्र दलाने अमेरिकेने पुरवलेल्या आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम (ATACMS) क्षेपणास्त्रांसह रशियाच्या हद्दीत पहिला हल्ला केला होता. याबाबत रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला होता की, कीवने रशियाच्या ब्रांस्क भागात अमेरिकन बनावटीचे सहा ATACMS डागले होते. त्यापैकी पाच क्षेपणास्त्रे पाडण्यात आली आणि सहाव्या क्षेपणास्त्राचे नुकसान झाले.
स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे किती घातक?
स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्र एक अँग्लो-फ्रेंच क्रूझ क्षेपणास्त्र आहे, ज्याचा कमाल पल्ला जवळपास १५५ मैल म्हणजेच २५० किमी आहे. हे क्षेपणास्त्र बंकर नष्ट करणारी शस्त्रे घेऊन जाऊ शकते. तसेच, त्याचा वेग हवाई संरक्षणास चकमा देण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
क्षेपणास्त्र प्रक्षेपणानंतर, त्याच्या नेव्हिगेशन सिस्टमसह सुसज्ज शस्त्राच्या इन्फ्रा-रेड सीकरचा वापर करून, त्याच्या लक्ष्यावर लॉक होण्यापूर्वी ते कमी उंचीवर खाली उतरते. त्यामुळे त्याची उपस्थिती शोधणे कठीण होते. यानंतर, लक्ष्यावर अंतिम हल्ला करण्यासाठी ते त्याच्या कमाल उंचीवर जाते, जेणेकरून लक्ष्य अचूक राहते. या क्षेपणास्त्राव्यतिरिक्त, ते ताशी ६०० मैलांपेक्षा जास्त वेगाने प्रवास करते.
दरम्यान, युक्रेन गेल्या काही काळापासून या ५ मीटर लांब आणि ३ मीटर विंगस्पेन असलेल्या क्षेपणास्त्रांचा वापर करत आहे. मात्र, आता युक्रेनला रशियामध्ये लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे ही क्षेपणास्त्रे आता रशियाच्या अंतर्गत भागात हल्ला करण्यासाठी तयार आहेत.