Russia vs Ukraine War: युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोठी घोषणा! परदेशी नागरिकही होऊ शकतात सहभागी; अर्जही झाले सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 05:38 PM2022-02-28T17:38:13+5:302022-02-28T17:53:02+5:30
रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत.
रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात जगातील महत्त्वाचे देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. युद्धाच्या पाचव्या दिवशीही रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. आज रशियाने युक्रेनच्या खेरसन आणि खारकीव प्रांतात पुन्हा हल्ले केले. रशियाने खेरसन आणि कारकीवमध्ये मिसाईल हल्ले केले. या मिसाईल हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे.
रशिया-युक्रेनमध्ये मागील चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. सोमवारी पाचव्या दिवशीदेखील युद्ध सुरूच आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियन सैन्यातील 4300 हून अधिकजणांना प्राण गमवावे लागले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तर, रशियाच्या हल्ल्यात 116 मुलांसह 1684 नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने सांगितले. तर, जीवितहानीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आणि अन्य युरोपीयन देशांद्वारे रशियात लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यावर सहमती दर्शवली. याचपार्श्वभूमीवर रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसच्या गोमेल शहरात सध्या बैठक सुरु आहे. मात्र याचदरम्यान युक्रेनने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. युक्रेनने लष्कराची एक नवीन तुकडी म्हणजेच International Legion तयार करण्याची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे रशियाचा सामना करण्यासाठी इतर देशांतील लोक त्यात सहभागी होऊ शकतील. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नवीन युनिट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आम्हाला परदेशी नागरिकांकडून हजारो अर्ज मिळत आहेत, जे रशियाला तोंड देण्यासाठी आणि जगाचे संरक्षण करण्यासाठी आमच्यासोबत येऊ इच्छितात.
Russia vs Ukraine War: रशियाने ताब्यात घेतली पृथ्वीवरील सगळ्यात धोकादायक जागा; ३१ वर्षांपूर्वी घडला होता अपघात https://t.co/RPHgus5S97#RussiaUkraineWar
— Lokmat (@lokmat) February 28, 2022
पुतीन यांना झटका-
रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचा निषेध म्हणून अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र त्यामुळे रशियाला फारसा फरक पडला नाही. यानंतर अमेरिकेसह युरोपियन देशांनी युक्रेनचा लष्करी मदत देण्यास सुरुवात केली. आता तब्बल २८ देशांनी रशियाविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
पाश्चिमात्य देशांनी रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. युरोपियन युनियननं रविवारी याबद्दलची घोषणा केली. संघटनेच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयेन यांनी याबद्दलची माहिती दिली. रशियाची विमानं, रशियात नोंद झालेली विमानं आणि रशियाचं नियंत्रण असलेल्या विमानांचा यात समावेश आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियनसोबतच कॅनडानंही रशियन विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे.