रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात जगातील महत्त्वाचे देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. युद्धाच्या पाचव्या दिवशीही रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. आज रशियाने युक्रेनच्या खेरसन आणि खारकीव प्रांतात पुन्हा हल्ले केले. रशियाने खेरसन आणि कारकीवमध्ये मिसाईल हल्ले केले. या मिसाईल हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे.
रशिया-युक्रेनमध्ये मागील चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. सोमवारी पाचव्या दिवशीदेखील युद्ध सुरूच आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियन सैन्यातील 4300 हून अधिकजणांना प्राण गमवावे लागले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तर, रशियाच्या हल्ल्यात 116 मुलांसह 1684 नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने सांगितले. तर, जीवितहानीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आणि अन्य युरोपीयन देशांद्वारे रशियात लावण्यात आलेल्या निर्बंधानंतर रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यावर सहमती दर्शवली. त्यानंतर आज रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसच्या गोमेल शहरात रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीनंतररही रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ही बैठक जवळपास साडेतीन तास चालली. तसेच या बैठकीत रशियासमोर युक्रेनने क्रिमिया आणि डोनबाससह संपूर्ण देशातून आपले सैन्य मागे घेण्याची मागणी केली असल्याची माहिती मिळत नाही.
रशिया सैन्यानं आण्विक हल्ल्याचा सराव सुरु केला-
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा धोका पाहता रविवारी Nuclear Deterrent Forceला अलर्ट राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता आण्विक हल्ल्याचं संकट उभं राहत आहे. रशिया मीडियाने केलेल्या दाव्यानूसार रशिया सैन्यानं आण्विक हल्ल्याचा सराव सुरु केला आहे. रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सर्गेई शोइगु यांनी त्यांचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनाही याबाबत माहिती दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाकडे जगात सर्वाधिक ५ हजार ९७७ अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे या रशिया मीडियाच्या दाव्यानंतर जगभरात धाबे दणाणले आहे.
पुतीन यांना झटका-
रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा पाचवा दिवस आहे. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाचा निषेध म्हणून अमेरिकेसह युरोपियन देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. मात्र त्यामुळे रशियाला फारसा फरक पडला नाही. यानंतर अमेरिकेसह युरोपियन देशांनी युक्रेनचा लष्करी मदत देण्यास सुरुवात केली. आता तब्बल २८ देशांनी रशियाविरोधात मोठा निर्णय घेतला आहे.
पाश्चिमात्य देशांनी रशियन विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. युरोपियन युनियननं रविवारी याबद्दलची घोषणा केली. संघटनेच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयेन यांनी याबद्दलची माहिती दिली. रशियाची विमानं, रशियात नोंद झालेली विमानं आणि रशियाचं नियंत्रण असलेल्या विमानांचा यात समावेश आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियनसोबतच कॅनडानंही रशियन विमानांसाठी हवाई हद्द बंद केली आहे.