युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या कुर्स्क नावाच्या भू-भागावर कब्जा केला आहे. आता हा भू-भाग परत मिळवण्यासाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन तयारी करत आहेत. यासाठी रशियन सैनिक प्रत्युत्तरता कारवाई करतील. मात्र, रशियन सैनिकांसाठी असे करणे सोपे नाही. त्याना एक कठीण लढाई लढावी लागणार आहे. सीआयएचे उपसंचालक डेव्हिड कोहेन यांनी बुधवारी यासंदर्भात भाष्य केले आहे. कोहेन यांच्या मते, युक्रेनने रशियाच्या जवळपास 300 वर्ग मैल म्हणजेच 777 वर्ग किमी एवढ्या भू-भागावर कब्जा केला आहे.
युक्रेनच्या सैन्याने 6 ऑगस्ट रोजी रशियाची पश्चिम सीमा ओलांडली आणि कुर्स्क प्रदेश ताब्यात घेतला. मात्र, हा भाग ताब्यात ठेवण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. केवळ काही काळासाठीच असे करण्यात आले असल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. कोहेन यांनी इंटेलिजन्स आणि नॅशनल सिक्युरिटी समिटमध्ये ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले, "रशिया आपला भू-भाग मिळवण्यासाठी युक्रेनवर जोरदार हल्ला करू शकतो. मात्र रशियासाठी ही एक कठीण लढाई असेल, असे मला वाटते. कारण त्यांना केवळ रशियाच्या हद्दीत असलेल्या एका आघाडीच्या फळीचाच सामना करावा लागणार नाही, तर त्यांना रशियन प्रदेशाचा एक भाग गमावला म्हणून त्यांच्या समाजातील प्रतिवादाचाही सामना करावा लागेल.
युक्रेनने रशियाच्या कुर्स्क भागातील 100 वसाहती ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. तसेच, रशियन सैन्य युक्रेनच्या पूर्व डोनेट्स्क भागात पुढे सरकत आहे. कोहेन म्हणाले, रशिया आपल्या सैन्यावर आणि उपकरणांवर प्रचंड पैसा खर्च करत आहे, मात्र ते यशस्वी होणार नाहीत.