कीव - रशियाशी युद्ध सुरू असलेल्या युक्रेनच्या एका अधिकृत ट्विटर हँडलवरील ट्वीटने खळबळ उडवून दिली. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने कालीमातेचे आक्षेपार्ह चित्र ट्वीट केले होते. ते व्हायरल होताच चोहोकडून टीकेची झोड उठली. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाला ही पोस्ट काढून टाकणे भाग पडले. ‘आर्ट ऑफ वर्क’ या नावाने एक मीम पोस्ट करण्यात आली होती. हे चित्र काहीसे हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोच्या एक प्रसिद्ध पोझसारखे होते. मात्र, हिंदू देवीच्या प्रतिमेचा वापर केल्याने भारतातील नेटिझन्स संतप्त झाले. त्यांनी परराष्ट्रमंत्र्यांना ही पोस्ट टॅग करून कारवाईची मागणी केली.
कालीमातेचे चित्र पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांतच युक्रेनला फटकारणाऱ्या प्रतिक्रियांचा अक्षरश: पूर आला. माहिती व तंत्रज्ञान खात्याचे वरिष्ठ सल्लागार कंचन गुप्ता यांनी युक्रेनच्या भारतातील राजदूतावासाला टॅग करून कडाडून टीका केली. तुम्हाला रशियाविरुद्धच्या युद्धात भारताचे समर्थन आणि पाठिंबा हवा. मात्र, अशा प्रकारे पाेस्टर टाकून तुम्ही जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. याशिवाय भारतातील असंख्य संतप्त ट्विटर वापरकर्त्यांनीही टीका केली.