युक्रेन होरपळतोय अन् युरोप नुसताच बघतोय; माजी जगज्जेता बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पॅरोव्हचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 10:59 AM2022-03-13T10:59:26+5:302022-03-13T10:59:42+5:30

कॅस्पॅरोव्ह यांनी म्हटले आहे की, गेल्या वीस वर्षांपासून पुतिन यांनी आपल्या कारकिर्दीत रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार व गुन्हे केले आहेत.

Ukraine is on the run and Europe is just watching; Said Veteran chess player Gary Kasparov's | युक्रेन होरपळतोय अन् युरोप नुसताच बघतोय; माजी जगज्जेता बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पॅरोव्हचे टीकास्त्र

युक्रेन होरपळतोय अन् युरोप नुसताच बघतोय; माजी जगज्जेता बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पॅरोव्हचे टीकास्त्र

Next

- समीर परांजपे

युक्रेन जळत आहे व अमेरिका, युरोप बघ्याच्या भूमिकेत आहेत. पुतिन क्रिमियाप्रमाणे युक्रेनचा घास गिळू पाहात आहेत हे पाश्चिमात्य देशांना दिसत होते. पण त्यांनी गेले पाच महिने पुतिन यांना इशारा देणे तसेच काही निर्बंध लादण्याशिवाय बाकी काहीही कारवाई केलेली नाही, अशी खरमरीत टीका रशियाचा माजी जगज्जेता बुद्धिबळपटू व मानवी हक्कांसाठी लढा देणारे गॅरी कॅस्पॅरोव्ह यांनी केली. पत्रकार शोमा चौधरी यांनी युक्रेनच्या प्रश्नावर घेतलेल्या एका मुलाखतीत कॅस्पॅरोव्ह यांनी पुतिन यांच्यावरही अतिशय परखड भाष्य केले.

कॅस्पॅरोव्ह यांनी म्हटले आहे की, गेल्या वीस वर्षांपासून पुतिन यांनी आपल्या कारकिर्दीत रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार व गुन्हे केले आहेत. क्रिमियावर आक्रमण केल्यानंतर पुतीन यांचे सारे लक्ष युक्रेनवर होते. त्या देशाच्या विरोधात ते गेली काही वर्षे सातत्याने आक्रमक वक्तव्ये करत आहेत. क्रिमियावर रशियाने आक्रमण केले त्यावेळी अमेरिका, युरोपीय देशांनी बोटचेपी भूमिका घेतली होती. 

युक्रेनवर हल्ला झाल्यास अमेरिका रशियाला चोख प्रत्युत्तर देईल, अशी गर्जना करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व युरोपीय देशांनी प्रत्यक्ष वेळ आल्यानंतर फारसे काहीही केले नाही. रशियावर आता जे निर्बंध पाश्चिमात्य देशांनी घातले आहेत तशीच कृती क्रिमिया आक्रमणाच्या वेळी केली असती तर पुतिन यांना वेळीच रोखता आले असते. त्यामुळे रशियाने कदाचित युक्रेनवर आक्रमण केलेही नसते. मात्र आता सर्व जर तरच्या गोष्टी झाल्या आहेत. 

गॅरी कॅस्पॅरोव्ह म्हणाले की, युक्रेनची जनता रशियाच्या अत्याचारांना बळी पडत आहेत. या युद्धामुळे आपण सारे जण तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहोत. पुतिन यांच्या हुकुमशाहीच्या झळा रशियाच्या शेजारील राष्ट्रांनाच नव्हे तर साऱ्या जगालाच सोसाव्या लागत आहेत. रशियाकडे तेल व नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत. मात्र जगातील अतिशय प्रगत तंत्रज्ञान पाश्चिमात्य देशांकडे आहे. रशियावर आर्थिक क्षेत्राप्रमाणे इतर क्षेत्रांतही कडक निर्बंध लादले तर पुतिन यांची पुरती कोंडी होऊ शकते.

विंटर इज कमिंग

बुद्धिबळाचे शहेनशहा असलेले गॅरी कॅस्पॅरोव्ह यांनी ‘विंटर इज कमिंग’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर त्या पुस्तकात घणाघाती टीका आहे. पुतीन तसेच त्यांच्यासारख्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच न रोखल्यास जगात अनर्थ घडेल असे त्या पुस्तकात कॅस्पॅरोव्ह यांनी म्हटले आहे. 

Web Title: Ukraine is on the run and Europe is just watching; Said Veteran chess player Gary Kasparov's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.