रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे. या युद्धामध्ये दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) यांच्या आदेशानंतर रशियाच्या आण्विक प्रतिबंधक तुकड्या (Nuclear Deterrence Force) अलर्ट मोडवर आहेत. युद्ध मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र या दबावाला न जुमानता रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. रशिया पुन्हा एकदा युक्रेनची राजधानी कीववर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत आहेत. युद्धाचा आज आठवा दिवस सुरू असून युक्रेन अजूनही रशियन फौजांचा प्रतिकार करत आहे. यामागचं मोठं कारण म्हणजे युक्रेनचं लष्कर सातत्यानं रशियन हल्ल्याला जशास तसं उत्तर देत आहेत. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याला जीवाची पर्वा करत असाल तर माघारी जाण्याचं इशारा दिला आहे.
रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांची दोनवेळा महत्वाची बैठक झाली. मात्र या बैठकीनंतरही काही तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर आज पुन्हा दोन्ही देशांमध्ये पोलंड सीमेवर चर्चा होणार होती. मात्र चर्चेच्या दोन फेऱ्या अयशस्वी ठरल्यानंतर चर्चा थांबली आहे. यूक्रेननं रशियाशी चर्चा करण्यास नकार दिला असल्याची माहिती आता समोर येत आहे.
युक्रेनचे मोठे शहर रशियाच्या ताब्यात-
रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांनी देश सोडून पलायन केले आहे. सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या खेरसन शहराने गेल्या वर्षी नाटो-समर्थित युद्ध सरावाचे आयोजन केले होते. अशा स्थितीत हे शहर काबीज करणे म्हणजे रशियासाठी मोठे यश आहे. आता रशियन सैन्य राजधानी कीवकडे कुच करत आहे.
महापौरांनी गुडघे टेकले-
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले की, रशियाने खेरसनवर पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तीन दिवसांपासून नाकाबंदी करण्यात आली होती, त्यामुळे अन्नपदार्थ आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धा आणि अन्य कारणांमुळे रुग्णालयात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठीही संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान, खेरसनच्या महापौरांनीही रशियन सैन्यासमोर गुडघे टेकल्याची माहिती समोर येत आहे.