पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न, युक्रेनने मध्यरात्री घरावर केला ड्रोन हल्ला, रशियाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 07:26 AM2023-05-04T07:26:36+5:302023-05-04T07:27:13+5:30
घटनेवेळी पुतिन क्रेमलिनबाहेर, इमारतीचे किरकोळ नुकसान
मॉस्को : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. युक्रेनकडून मध्यरात्री रशियाच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या क्रेमलिनवर ड्रोन हल्ला करण्यात आला. अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा युक्रेनचा कट असल्याचा आरोप रशियाने केला. हे रशियाचेच कारस्थान असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
दोन ड्रोनद्वारे क्रेमलिनवर हल्लाचा प्रयत्न केला. मात्र, ते तातडीने निष्क्रिय करण्यात आले. वास्तूचे कोणतेही नुकसान झाले नाही. हल्ला झाला त्यावेळी पुतिन हे क्रेमलिनमध्ये नव्हते. ते सुरक्षित असल्याचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जारी केले. ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. वास्तूच्या घुमटानजीक थोडीफार आग लागली असून धूरही निघत असल्याचे त्यात दिसत आहे.
जोरदार प्रत्युत्तर देणार
रशियाच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले. झेलेन्स्की फिनलंड दौऱ्यावर असून तेथे त्यांनी स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क आणि आइसलॅंडच्या नेत्यांची भेट घेतली. आम्हाला लवकरच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा होणार असल्याचा विश्वास झेलेन्स्की यांनी व्यक्त केला.
किव्ह नष्ट करा!
क्रेमलिनवरील ड्रोन हल्ल्यानंतर रशियाने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. यापुढे झेलेन्स्की यांच्याशी कोणतीही वाटाघाटी करणार नसल्याचे रशियाचे खासदार वाचेस्लाव वोलोदिन यांनी म्हटले. तसेच किव्ह नष्ट करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन रशियाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केले.
परस्परांवर ड्रोन हल्ले
मागील काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत. रशियाने सलग तिसऱ्या दिवशी युक्रेनची राजधानी कीव्हसह अन्य ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ला केला. तसेच युक्रेनने केलेल्या ड्रोनच्या हल्ल्यात रशियातील तेल डेपोला भीषण आग लागली.