दोन वर्ष झाली... रशियाशी युद्ध संपेना; अखेर युक्रेनच्या सैन्याकडून घेण्यात आला मोठा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 09:00 AM2024-04-04T09:00:12+5:302024-04-04T09:03:51+5:30
Russia Ukraine War: दोन्ही देशांना सैनिकांची कमतरता भासल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Russia Ukraine War, Volodymyr Zelenskyy : युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून अधिक काळ युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांचे अनेक सैनिक मारले गेले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना सैनिकांची कमतरता भासल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. युक्रेनच्या सैन्यदलात खालच्या दर्जाची पदे भरण्यासाठी हा नियम बनवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनमध्ये 'मोबिलायझेशन लॉ' लागू करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर एका दिवसाच्या आत हा कायदा लागू करण्यात आला आहे. युक्रेनच्या संसदेत हा कायदा गेल्यावर्षीच पारित करून घेण्यात आला होता, मात्र हा कायदा लागू करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांना इतका वेळ का लागला हे समजू शकलेले नाही.
युक्रेनने सैन्य दलात भरतीची अट असलेली वयोमर्यादा 27 वरून 25 वर आणली आहे. सैन्यात नव्या दमाच्या नागरिकांनी सहभागी व्हावे आणि देशसेवेसाठी हातभार लावावा हा यामागचा उद्देश असल्याचे अनेक जाणकारांचे मत आहे. तसेच दोन वर्षांहून अधिक काळ चालत असलेल्या युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांची अनेक पदे रिक्त आहेत. या पदांवर नव्याने भरती करण्यासाठी सैनिकांची गरज आहे. अशावेळी पदभरतीच्या वयोमर्यादेची अट शिथिल केल्याने सैन्याच्या भरतीसाठी तरुण मंडळी अधिक उत्साहाने सामील होतील, अशी आशा सैन्यदल आणि प्रशासनाला आहे.
सैनिकांच्या कमतरतेमुळे 'मोबिलायझेशन लॉ' लागू करण्यात आला आहे. मात्र राष्ट्राध्यक्षांनी याबाबत कोणतीही सार्वजनिक टिप्पणी केलेली नाही. तसेच देशाला किती नवीन सैनिक मिळतील किंवा कोणत्या दर्जाची पदे भरली जातील याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून युक्रेनला पायदळातील सैनिकांची कमतरता भासत आहे. तसेच दारुगोळ्याची ही कमी जाणवत आहे. अशावेळी सैन्य भरती हा एक संवेदनशील विषय ठरलेला आहे. या गोष्टी लक्षात घेता रशियाने युद्धात अधिक आक्रमक होत पुढाकार घेण्याचे ठरवले आहे. युक्रेनच्या कमतरता लक्षात घेऊन त्याचा फायदा उचलणे आणि योजनाबद्ध पद्धतीने युक्रेनवर हल्ला चढवणे, असा रशियाचा प्लॅन असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. यावर प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय झाल्याचे समजते.