Russia-Ukraine Crisis: रशियाविरोधात युक्रेन सरकारनं मोठी कारवाई केली आहे. युक्रेनच्या संसदेनं आपत्कालीन स्वरुपात एका कायद्याला मंजुरी दिली असून आता युक्रेनमधील रशियन नागरिकांची संपत्ती जप्त केली जाणार आहे. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांच्यावतीनं यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. जेलेन्स्की यांनी मंगळवारी युरोपियन संसदेला संबोधित केलं होतं. यात जेलेन्स्की यांनी रशियानं सर्वसामान्य नागरिकांवर मिसाइल हल्ला केला आणि यासाठी रशियाला कधीच माफ केलं जाणार नाही. रशियाची ही कारवाई कधीच विसणार नाही, असं म्हटलं होतं.
युक्रेनवरील हल्ल्याबाबत रशियाविरोधात याआधीच अनेक देशांनी अनेक निर्बंध लावले आहेत. तसंच गुरुवारी काही कंपन्यांनी रशियासोबतचा व्यापार ठप्प करण्याची घोषणा केली. तसंच पुरवठा देखील थांबवला आहे. युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ जगातील सर्वात मोठा फर्निचर ब्रँड असलेल्या IKEA नं रशियातील सर्व स्टोअर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच रशिया आणि बेलारुसमधील आपलं सर्व सोर्सिंग थांबवणार आहे.
रशियातील नेक्स्टा टीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, डियाजियो कंपनीनं रशियाला मद्याचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रशियाची कोंडी करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.