रशिया हा दहशतवादी देश आहे. रशियाचा हल्ला म्हणजे हा दहशतवादच आहे. रशियाच्या हल्ल्यात काल युक्रेनमधील १६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. आमचे नागरिक या हल्ल्याची किंमत चुकवत आहेत. पण आमचा लढा स्वातंत्र्यासाठी असून आम्हाला इतर देशांचा पाठिंबा मिळत आहे. पण रशियाची ही वागणूक ना कोणी माफ करणार, ना कोणीही विसरेल, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं. त्यांनी आज युरोपियन संसदेच्या विशेष बैठकीसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण केलं.
झेलेन्स्की म्हणाले की, ही माझ्यासाठी, प्रत्येक युक्रेनी नागरिकासाठी, आमच्या देशासाठी एक मोठी आपत्ती आहे. मला आनंद आहे की, आम्ही आज तुम्हा सर्वांना, युरोपियन युनियनच्या देशांना एकजूट केले आहे. मात्र मला हे माहिती नव्हते की, याची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल. रशिय़ाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमध्ये विध्वंस होत असून अनेक शहरं बेछिराख होत आहेत. नागरिकांचा आत्मविश्वास वाढवून आपण लढा कायम ठेवणार हे सांगताना झेलेन्स्की म्हणाले, आमचा लढा आमच्या जमिनीसाठी, स्वातंत्र्यासाठी आहे. आमची सर्व शहरं घेरली असली तरी आम्हाला कोणीच तोडू शकत नाही. आम्ही ताकदवर आहोत, आम्ही युक्रेनियन आहोत, असं झेलेन्स्की यावेळी म्हणाले.
आमचा निर्धार पक्का आहे. आमचं मनोधैर्य प्रचंड उंचावलेलं आहे. आम्ही लढत आहोत. आमच्या हक्कांसाठी, आमच्या स्वातंत्र्यासाठी, आयुष्यासाठी. आम्ही जिवंत राहण्यासाठी लढत आहोत. तीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. यासोबत आम्ही लढा देत आहोत युरोपचे बरोबरीचे सदस्य होण्यासाठी. आज आम्ही लोकांना दाखवून देत आहोत की आम्ही नेमके कोण आहोत, असं झेलेन्स्की यांनी सांगितलं.
झेलेन्स्की यांनी युरोपला मदतीचं आवाहन देखील केलं आहे. आम्ही जोडले गेलो, तर युरोपियन युनियन अजून सक्षम होईल. पण तुमच्याशिवाय युक्रेन एकटं पडेल. आम्ही आमचं सामर्थ्य सिद्ध केलं आहे. आम्ही किमान हे तरी सिद्ध केलं आहे की आम्ही देखील तुमच्यासारखेच आहोत. त्यामुळे हे सिद्ध करा की तुम्हीदेखील आमच्यासोबत आहात, असं झेलेन्स्की यांनी सांगितलं. झेलेन्स्की यांचे संबोधन पूर्ण झाल्यानंतर युरोपियन युनियनच्या सदस्यांनी उभे राहून टाळ्या त्यांना मानवंदना दिली.
दरम्यान, युक्रेनविरुद्ध युद्ध जाहीर केल्यानंतर दोन दिवसांत विजय नक्की अशी खात्री रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना होती. मात्र युक्रेननं अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या नेतृत्त्वाखाली चांगला प्रतिकार केला. युद्धाचा सहावा दिवस उजाडला असला तरीही रशियन सैन्याला युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेता आलेली नाही. कीववर हल्ले करणाऱ्या रशियावर युक्रेनच्या सैन्यावर जोरदार प्रतिहल्ला चढवला.
राजधानी कीव ताब्यात घेण्याचे रशियाचे प्रयत्न युक्रेनच्या फौजा हाणून पाडताना दिसत आहेत. युक्रेनच्या सैन्यानं रशियन सैन्याला जोरदार दणका दिला आहे. पाश्चिमात्य देशांकडून मिळालेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांच्या मदतीनं युक्रेनी सैन्यानं रशियन लष्कराचं मोठं नुकसान केलं आहे. युक्रेनमधल्या रस्त्यांवर ठिकठिकाणी रशियाचे रणगाडे, तोफ, शस्त्रसज्ज वाहनं उद्ध्वस्त झालेल्या स्थितीत दिसत आहेत. मात्र यानंतरही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन सैन्याला माघारी बोलावण्यास तयार नाहीत.