रशियाविरुद्धच्या युद्धादरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कारला भीषण अपघात, प्रकृतीबाबत आली अशी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 08:41 AM2022-09-15T08:41:19+5:302022-09-15T08:41:58+5:30
Volodymyr Zelenskyy Car Accident: रशियाने आक्रमण केल्यानंतर युक्रेन आणि रशियामध्ये सुरू झालेले युद्ध सहा महिन्यांनंतरही सुरू आहे. यादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कारला भीषण आपघात झाला आहे.
किव्ह - रशियाने आक्रमण केल्यानंतर युक्रेन आणि रशियामध्ये सुरू झालेले युद्ध सहा महिन्यांनंतरही सुरू आहे. यादरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कारला भीषण आपघात झाला आहे. एक वाहन झेलेन्स्कींच्या ताफ्याला आणि त्यांच्या कारवर येऊन आदळले. दरम्यान, या अपघातात झेलेन्स्की यांना गंभीर दुखापत झालेली नाही.
झेलेन्स्की यांच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने द किव्ह इंडिपेंडेंटने सांगितले की, झेलेन्स्की यांच्या प्रवक्त्याने एका फेसबूक पोस्टमध्ये सांगितले की, एक वाहन झेलेन्स्की यांची कार आणि ताफ्यावर आदळले. या मीडिया पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर झेलेन्स्की यांची तपासणी करण्यात आली. तसेच डॉक्टरांनी सांगितले की, अपघातात झेलेन्स्की यांना गंभीर दुखापत झालेली नाही. झेलेन्स्की यांच्यासोबत राहणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या ड्रायव्हरही उपचार केले आणि त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये पाठवण्यात आले. दरम्यान, या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही प्रवक्त्यांनी सांगितले.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध निर्णायक वळणावर पोहोचले आहे. झेलेन्स्की यांनी रशियाच्या ताब्यातून मुक्त करण्यात आलेल्या इजियम शहराचा दौरा केला. तसेच युद्धात दाखवलेल्या शौर्यासाठी सैनिकांचे आभार मानले. शहरातील सिटी हॉल जळाला आहे. मात्र त्याच्यासमोर युक्रेनचा झेंडा डौलाने फडकत आहे. अनेक इमारती जळाल्या आहेत. तसेच तोफांच्या माऱ्यामुळे त्यांचं नुकसान झालं आहे.
रशियन सैनिकांनी गेल्या आठवड्यात हे शहर सोडले होते. कारण युक्रेनकडून रशियन सैनिकांना जबरदस्त प्रत्युत्तर मिळत होते. काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या सैन्याने खारकिव्हमधील मोठा भूभागही रशियन सैन्याच्या तावडीतून पुन्हा एकदा मुक्त केला होता. दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने बुधवारी रशियन सैन्याच्या गोळीबारात ७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, २२ जण जखमी झाल्याची माहिती दिली.