Russia-Ukraine Crisis: युद्धासाठी अमेरिका तैयार, जापानमध्ये तैनात केली F-35A लढाऊ विमाने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 09:54 PM2022-02-24T21:54:45+5:302022-02-24T21:55:20+5:30
रशियाला चीन किंवा उत्तर कोरियाकडून मदत मिळू नये, यासाठी अमेरिकेने जापानमध्ये लढाऊ विमाने तैनात केली आहेत.
सियोल: रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. रशियाविरोधात युक्रेनच्या पाठिशी अनेक देश असल्याने जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट आहे. यातच अमेरिकेने अमेरिकेने(America) कुठल्याही रडारला चकवा देणारे F-35A(F-35A Fighter Planes) लढाऊ विमानाची जापानमध्ये तैनाती केली आहे. युद्ध झाल्यावर रशियाला चीन(China) किंवा उत्तर कोरियाची (North Korea) मदत मिळू नये, यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याचे बोलले जात आहे.
कडेना हवाई तळावर विमानाची तैनाती
यूएस इंडो-पॅसिफिक कमांडने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अलास्का येथील 354 व्या फायटर ब्रँचचे F-35A विमान रविवारी हवाई मोहिमेसाठी आले होते. यासाठी ओकिनावाच्या कडेना हवाई तळावर विमानाची तैनाती करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चार B-52 आण्विक-सक्षम बॉम्बर लाँच करण्यात आले होते, योनहाप न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिले. त्यानंतर आता ही लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत.
9 चिनी लढाऊ विमानं तैवानच्या हद्दीत
एका बाजूला रशिया-युक्रेनचं युद्ध सुरू असताना दुसरीकडे चीननं संधी साधण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने आपली लढाऊ विमाने तैवानच्या दिशेने पाठवली आहेत. चीन आणि तैवान यांच्यातला संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. चीनने अनेकदा तैवानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच महिन्यात चीनच्या विमानांनी 12 वेळा तैवानवर अतिक्रमण केले. आता पुन्हा एकदा चीनची 9 लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीत दिसली आहेत.
युद्धाला सुरुवात
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये प्रवेश करुन बॉम्बवर्षावाने अनेक शहरांना हादरवले. युक्रेनने रशियाची 6 विमाने पाडली आहेत. रशियाचे 50 सैनिक ठार झाले आहेत, तर युक्रेनचे 40 सैनिक मारले गेल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनचे लष्करी विमान क्यिवजवळ कोसळलं आहे, यात 14 जण होते.