रशिया-युक्रेन संघर्षात अमेरिकेने रशियाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन मंगळवारी व्हाईट हाऊसमधील आपल्या संबोधनात म्हणाले, युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाची ही सुरुवात आहे. आम्ही परिस्थितीचे आकलन करत पावले उचलत आहोत. राष्ट्रापती बायडेन म्हणाले, "युक्रेनला मदत करण्याचे आमचे सर्व प्रयत्न हे बचावात्मक उपाय आहेत, आमचा रशियासोबत युद्ध करण्याचा कोणताही इरादा नाही." मात्र, रशिया आक्रमकपणे पुढे सरकत राहिला, तर त्याला भारी किंमत मोजावी लागेल, असा इशाराही बायडेन यांनी दिला आहे.
बायडेन म्हणाले की, एस्टोनिया, लातव्हिया आणि लिथुआनिया या बाल्टिक देशांमध्ये सैन्य आणि उपकरणे पाठवली जातील. बायडेन यांनी रशियावर आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यांनी युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात केले आहे. आम्ही नाटोच्या इंच-इंच भूमीचे रक्षण करू.
दरम्यान, रशियाच्या दोन वित्तीय संस्थांवर निर्बंधांची घोषणा करत राष्ट्रपती बायडेन म्हणाले, यापुढे रशियाला पाश्चात्य देशांशी व्यापार करता येणार नाही. आम्हाला अनेक निर्णय घ्यायचे आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरूच ठेऊ, असेही ते म्हणाले.
अमेरिकेने रशियाच्या कारवाईला प्रथमच मानले 'आक्रमण' - आता व्हाईट हाऊसने पूर्व युक्रेनमधील रशियन सैन्याच्या तैनातीचा उल्लेख करत, रशियाच्या या हालचाली म्हणजे 'आक्रमण' असल्याचे म्हटले आहे. "ही हल्ल्याची सुरुवात आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे," असे अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फिनर यांनी म्हणाले आहे. युक्रेन संकटाच्या सुरूवातीला अमेरिका या शब्दाचा वापर करण्यास कचरत होती.