रशियाने युक्रेनवर हल्ला करून आता दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. या काळात अमेरिकेने भारतासह जगाला रशियावरून धमकाविण्याचे काम केले होते. मात्र, स्वत: अब्जावधी बॅरल रशियन कच्चे तेल खरेदी केले होते. मात्र, आज या जी-७ देशांना भारताने आरसा दाखविल्यानंतर उपरती झाली आहे.
रशियावर अमेरिकेसह युरोपने अनेक निर्बंध लादले आहेत. परंतू ते कच्चे तेल आणि गॅससाठी रशियावर अवलंबून असल्याने फारसे काही करू शकत नव्हते. रशियानेही बाजारभावापेक्षा डिस्काऊंट रेटमध्ये कच्चे तेल देण्यास सुरुवात केली होती. आता सव्वा दोन महिन्यांनी विकसित देशांची संघटना जी ७ ने रशियन कच्चे तेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाकडून तेल खरेदी टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा रविवारी या देशांनी संकल्प केला आहे. या देशाच्या नेत्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्याशीदेखील चर्चा केली व समर्थन दिले. या जी-७ देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि जपान हे देश आहेत. यापैकी सर्वच देश रशियाच्या कच्च्या तेलाचे उपभोक्ते आहेत. "राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे मुख्य साधन नष्ट होईल आणि युद्ध लढण्यासाठी निधी संपेल.", असे या देशांनी रशियाचा तेल पुरवठा थांबवण्याच्या निर्णयावर म्हटले आहे.
मात्र, हे तातडीने केले जाणार नाही, टप्प्या टप्प्याने रशियाकडून तेल खरेदी कमी केली जाईल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची G-7 नेते आणि झेलेन्स्की यांच्यासोबत भेट सुमारे तासभर बैठक चालली. युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल अमेरिकेने रशियावर नवीन निर्बंधही जाहीर केले. व्हाईट हाऊसने 9 मे 'विजय दिन' च्या आधी नवीन निर्बंधांची घोषणा केली. हा दिवस रशिया 1945 मध्ये नाझी जर्मनीचा पराभव म्हणून साजरा करतो.