कीव – रशिया आणि यूक्रेन यांच्या सीमेवर सध्या प्रचंड तणावाची परिस्थिती आहे. रशिया कधीही यूक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. जर पुतीन यांनी आदेश दिले तर रशियन सैन्य ७२ तासांत यूक्रेनची राजधानी कीववर कब्जा करु शकते. यूक्रेनवर रशियानं हल्ला केल्यास यूक्रेनचे १५ हजार सैन्य जवान आणि रशियाचे ४ हजार जवानांचा मृत्यू होऊ शकतो असं अमेरिकन सैन्याचे चेअरमं ऑफ जॉईंट चीफ्स ऑफ स्टाफ जनरल मार्क यांनी सांगितले आहे.
इतकचं नाही तर या युद्धामुळे ५० हजार सर्वसामान्य लोकांचाही जीव जाऊ शकतो असं गुप्तचर यंत्रणेने अलर्ट केले आहे. जनरल मार्क यांनी अमेरिकेच्या खासदारांना सांगितले की, रशिया जर त्यांच्या ताकदीनं यूक्रेनवर हल्ला करत असेल तर ७२ तासांत ते कब्जा करु शकतात. या माहितीनंतर अमेरिकेच्या अनेक खासदारांनी चिंता व्यक्त करत वेगाने ज्यो बायडन प्रशासनाला यूक्रेनच्या मदतीला सैन्याची ताकद देण्याची मागणी केली. त्यात एंटी एअरक्राफ्ट मिसाइल आणि रॉकेट लॉन्चर सिस्टम यांचाही समावेश आहे. जेणेकरुन यूक्रेनला रशियाच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळेल.
याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी इशारा दिलाय की, रशिया यूक्रेनवर कधीही हल्ला करु शकते. या संघर्षामुळे माणुसकीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. या महिन्याच्या मध्यापर्यंत रशियानं यूक्रेनवर हल्ला करण्याच्या जवळपास सर्व तयारी केलेली असेल. जर युद्ध झालं तर यूक्रेनमध्ये मोठी मनुष्यहानी होईल. परंतु रशियालाही किंमत मोजावी लागेल. रशिया ७२ तासांत ‘कीव’वर कब्जा करेल परंतु यात ५० हजार लोकांचा जीव जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यूक्रेननं ‘महाविनाश’ इशारा फेटाळला
याच दरम्यान, यूक्रेननं अमेरिकेच्या या इशाऱ्याला फेटाळून लावलं आहे. अमेरिकेने व्यक्त केलेल्या इशाऱ्यावर आमचा विश्वास नाही असं सांगत यूक्रेनचे परराष्ट्र मंत्री दमयत्रो कुलेबा यांनी प्रश्न निर्माण केले आहेत. या महाविनाशाच्या भविष्यवाणीवर भरवसा नाही. विविध विविध राजधानींसाठी परिस्थिती भिन्न आहे. परंतु यूक्रेन कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. आमच्याकडे मजबूत सैन्य दल आहे. जगभरातून आम्हाला समर्थन मिळतंय. त्यामुळे आम्हाला नव्हे तर आमच्या शत्रूंना भय वाटण्याची गरज आहे असं यूक्रेननं म्हटलं आहे.