नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून रशिया आणि यूक्रेन यांच्यातील संघर्ष वाढताना पाहायला मिळत आहे. कुठल्याही क्षणी या दोन्ही देशात युद्ध होण्याची परिस्थिती आहे. त्यातच रशिया-यूक्रेन वादात इतर देशही उघडपणे भाष्य करायला लागले आहेत. त्यात रशियासोबत भारताचे चांगले संबंध पाहता या वादात भारत काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन कधीही यूक्रेनवर हल्ल्याचे आदेश देऊ शकतात.
रशिया-यूक्रेन संघर्षात अमेरिका, ब्रिटन, आणि ईयूसारख्या देशांनी रशियाला सतर्क केले आहे. परंतु पुतीन ऐकण्यास तयार नाही. हल्ल्याचे आदेश देताच याचा परिणाम केवळ युरोप नव्हे तर भारतावरही पडणार आहे. अमेरिकेने यूक्रेनमधून त्यांच्या राजदूत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मायदेशी येण्यास सांगितले आहे. पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यास त्याची किंमत मोजावी लागेल असं ब्रिटननं म्हटलं आहे. याच दरम्यान पश्चिमेकडे चीनला नियंत्रणात ठेवण्यासाठी रशियाची गरज भासू शकते असं जर्मन नेव्ही प्रमुखांनी सांगितले आहे.
तज्ज्ञांच्या मते, पश्चिमी देश यूक्रेनवर हल्ल्याच्या परिस्थितीत रशियाविरोधात विविध निर्बंध लावण्याची शक्यता आहे. अमेरिकन राष्ट्रपती ज्यो बायडन यांनीही तसे संकेत दिलेत. अशावेळी रशियाला चीनची गरज भासेल. चीन निर्बंधांचा परिणाम कमी करण्यासाठी रशियाला साथ देऊ शकतो. चीननं अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. परंतु यूक्रेननं नेटोचं सदस्य बनू नये असं चीननं म्हटलं होतं. त्यामुळे चीन-रशिया यांच्यात जवळीक वाढेल आणि त्याचा भारत-रशियाच्या मैत्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारतासाठी चिंता
स्वीडीश थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार, भारतात जवळपास ६० टक्के लष्करी साहित्य रशियाकडून पुरवलं जातं हे खूप महत्त्वाचं आहे. एकीकडे लडाख सीमेवर चीन आणि भारत यांच्यात अद्यापही संघर्ष सुरु आहे. अशावेळी यूक्रेन प्रकरणात भारत रशियाला नाराज करण्याची जोखीम घेऊ शकत नाही. दुसरीकडे युरोप आणि अमेरिकाही भारताचे महत्त्वपूर्ण भागीदार आहेत. भारत-चीना सीमेवर देखरेख ठेवण्यासाठी भारतीय सैन्याला अमेरिकी पट्रोल एअरक्राफ्टची मदत होते. सैनिकांसाठी विंटर क्लोथिंग भारत अमेरिका आणि युरोपमधून खरेदी करतो. अशावेळी भारत ना रशियाला सोडू शकतो पश्चिमी देशांना, त्यामुळे यूक्रेन-रशिया संघर्ष भारतासाठी कुठल्याही संकटापेक्षा कमी नाही.