Ukraine-Russia War: युक्रेनच्या 'चेर्नोबिल' न्यूक्लिअर प्लांटमध्ये रेडिएशन वाढले, रशियाने मिळवलाय ताबा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 04:09 PM2022-02-25T16:09:46+5:302022-02-25T16:11:14+5:30
Ukraine-Russia War: ज्या अणु उर्जा प्रकल्पात 1986 मध्ये जगातील सर्वात मोठा अणु अपघात झाला होता, त्या प्रकल्पावर आता रशियाने ताबा मिळवलाय.
कीव: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने युक्रेनमधलील अनेक शहरांवर आणि महत्वांच्या ठिकाणांवर ताबा मिळवलाय. यातच आता रशियाने ताबा मिळवलेल्या युक्रेनमधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातून(Chernobyl nuclear power plant) निघणाऱ्या रेडिएशनमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.
युक्रेनने दावा केला आहे की, प्लांटमधून निघणाऱ्या रेडिएशनमध्ये नेहमीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. सीएनएननुसार, न्युलियर प्लांटच्या अनेक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्यात आले आहे. युक्रेनच्या ग्राउंड फोर्सेसच्या कमांडरच्या सल्लागार अॅलोना शेवत्सोवा यांनी फेसबुकवरुन सांगितले की, रशियन सैन्याने पॉवर स्टेशनचा ताबा घेतला आहे आणि कर्मचाऱ्यांना ओलिस ठेवले आहे.
मोठा स्फोट झाला होता
मिळालेल्या माहितीनुसार, या अणु उर्जा प्रकल्पात एप्रिल 1986 मध्ये जगातील सर्वात भीषण अणु अपघात झाला होता. त्यावेळी अणुभट्टीतील स्फोटानंतर संपूर्ण युरोपमध्ये रेडिएशन पसरले होते. हा प्लांट युक्रेनची राजधानी कीवपासून उत्तरेस 130 किलोमीटर अंतरावर आहे. ज्या अणुभट्टीचा स्फोट झाला, त्यातील रेडिएशन रोखण्यासाठी त्याला संरक्षक उपकरणाने झाकण्यात आले होते. तसेच, प्लांटला निष्क्रीय करण्यात आले होते. पण, आता याच प्लांटमधून रिडिएशन निघत असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्राध्यक्षांनी दिली माहिती
गुरुवारी झेलेन्स्की यांनी ट्विट केले होते की, '1986 ची शोकांतिका पुन्हा घडू नये म्हणून आमचे रक्षक आपले प्राणाची आहुती देत आहेत. अणु उर्जा प्रकल्पावर ताबा मिळवणे, ही संपूर्ण युरोपवर युद्धाची घोषणा असेल. रशियाने चेरनोबिल अणु प्रकल्प ताब्यात घेतला, तर जगात मोठा विध्वंस होण्याची शक्यता वाढेल.'