Ukraine-Russia War: रशियाच्या अडचणीत वाढ? इतर देशांनी रशियन बँकांना 'SWIFT' मधून काढण्याचा घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 03:27 PM2022-02-27T15:27:07+5:302022-02-27T15:27:15+5:30
Ukraine-Russia War: युक्रेनवर हल्ला केल्याच्या विरोधात अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी रशियन बँकांना जागतिक आर्थिक पेमेंट सिस्टम(SWIFT)मधून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
वाशिंग्टन: युक्रेनवरील रशियन आक्रमणाच्या विरोधात अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी आणि भागीदारांनी बंदी घातलेल्या रशियन बँकांना जागतिक आर्थिक पेमेंट सिस्टम 'स्विफ्ट'(SWIFT) मधून वेगळे करण्याचा आणि रशियाच्या मध्यवर्ती बँकेवर प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिका, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि कॅनडाच्या नेत्यांनी शनिवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, बंदी घातलेल्या रशियन कंपन्या आणि कुलीन वर्गाच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी एक संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.
काय आहे SWIFT?
‘सोसायटी फॉर वर्ल्डवाइड इंटरबँक फायनांशिअल टेलीकम्युनिकेशन' (SWIFT) ही जगातील आघाडीची बँकिंग मेसेजिंग सेवा आहे, जी भारतासह 200 हून अधिक देशांमधील अंदाजे 11,000 बँका आणि आर्थिक संस्थांना जोडते. जागतिक आर्थिक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी ही व्यवस्था अत्यंत महत्त्वाची मानली जाते. रशिया यातून बाहेर फेकला गेला आहे, हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.
काय काम करते AWIFT ?
SWIFT ची स्थापना 1973 मध्ये झाली होती. हे प्रत्यक्षात पैशांचे कोणतेही हस्तांतरण स्वतः हाताळत नाही, परंतु त्यांची संदेश प्रणाली, जी 1970 मध्ये टेलेक्स मशीनवर अवलंबून राहण्यासाठी विकसित केली गेली होती, ती बँकांना जलद, सुरक्षित आणि स्वस्त संवाद साधण्याचे साधन प्रदान करते. बेल्जियम-आधारित असूचीबद्ध स्विफ्ट बँकांची सहकारी संस्था आहे, जी तटस्थ आहे.
म्युच्युअल फंड हस्तांतरण, ग्राहकांना पैसे हस्तांतरित करणे आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या ऑर्डरबद्दल प्रमाणित संदेश पाठवण्यासाठी बँका SWIFT प्रणाली वापरतात. 200 हून अधिक देशांमधील 11,000 हून अधिक वित्तीय संस्था SWIFT प्रणाली वापरतात, ज्यामुळे ती आंतरराष्ट्रीय आर्थिक हस्तांतरण प्रणालीचा कणा बनते. आर्थिक क्षेत्रातील त्याची प्रमुख भूमिका दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यातही आहे.
रशियात SWIFT चे नेतृत्व कोण करते?
राष्ट्रीय संघ रॉसविफ्टनुसार, युजर्सच्या संख्येच्या बाबतीत रशिया हा अमेरिकेनंतरचा दुसरा सर्वात मोठा देश आहे. या प्रणालीशी संलग्न सुमारे 300 रशियन वित्तीय संस्था आहेत. म्हणजे, निम्म्याहून अधिक रशियन वित्तीय संस्था SWIFT चे सदस्य आहेत. रशियाची स्वतःची देशांतर्गत आर्थिक पायाभूत सुविधा आहे, ज्यामध्ये बँक हस्तांतरणासाठी SPFS प्रणाली आणि व्हिसा आणि मास्टरकार्ड प्रणालींप्रमाणेच कार्ड पेमेंटसाठी मीर प्रणाली समाविष्ट आहे.
काय परिणाम होईल ?
SWIFT मधून बँका काढून टाकणे हे एक गंभीर निर्बंध मानले जाते, कारण जवळजवळ सर्व बँका ही प्रणाली वापरतात. रशिया त्याच्या महत्त्वपूर्ण तेल आणि वायू निर्यातीसाठी या प्रणालीवर खूप अवलंबून आहे. या निर्णयामुळे रशियन बँका आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेपासून दूर होतील आणि त्यांची जागतिक स्तरावर काम करण्याची क्षमता कमकुवत होईल.