Ukraine-Russia War: रशियाचा युक्रेनवर ताबा, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सैन्याच्या बंकरमध्ये घेतला आश्रय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 05:34 PM2022-02-25T17:34:06+5:302022-02-25T17:35:40+5:30
Ukraine-Russia War: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सैन्यच्या बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती मिळत आहे.
कीव: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा(Russia Ukraine Crisis) आज दुसरा दिवस आहे. युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, युक्रेनच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियन सैन्य राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहे. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की(Ukraine President Volodymyr Zelenskyy) यांनी सैन्य बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्राध्यक्षांचा बंकरमध्ये आश्रय
रशिया आणि युक्रेन यांच्यात जोरदार युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील अनेक शहरांवर ताबा मिळवला असून, युक्रेनमधील अणु उर्जा प्रकल्पही ताब्यात घेतला आहे. ताज्या माहितीनुसार, रशियाने युक्रेनला चर्चेची ऑफर दिली आहे. पण त्याआधी युक्रेनने त्यांची सैन्य कारवाई थांबवावी अशी अट ठेवली आहे. तर, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बंकरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
रशियाची युक्रेनला ऑफर
युक्रेनच्या सैन्याने शरणागती पत्करल्यास रशिया चर्चा करण्यास तयार असल्याचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटले आहे. रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना लावरोव यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. 'आम्ही वाटाघाटी करण्यासाठी कोणत्याही क्षणी तयार आहोत. युक्रेनच्या सैन्याने शस्त्रे खाली ठेवल्यास चर्चा करण्याची आमची तयारी आहे,' असं लावरोव म्हणाले आहेत.
युक्रेननेही ठेवली ही अट
यापूर्वी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मायखाइलो पोडोलियाक यांनीही रशियासमोर एक अट ठेवली आहे. युक्रेनची राजधानी कीव न्यूट्रॅलिटी संदर्भात युक्रेन रशियासोबत बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, त्याला सुरक्षेची हमी मिळायला हवी, असे ते म्हणाले आहेत.
युक्रेनच्या अनेक शहरांवर रशियाचा ताबा
युक्रेनच्या प्रमुख शहरांवर रशियन सैन्याने ताबा मिळवला आहे. रशियन आक्रमणामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. यातच रशियाने युक्रेनधील चेर्नोबिल अणु उर्जा प्रकल्पावर आधीच कब्जा केला आहे. दरम्यान, कीवपासून साधारणपणे 60 किलोमीटर अंतरावर वायव्येकडे असलेल्या इव्हान्कीव्ह येथे नदीवरील एक पूल शुक्रवारी सकाळच्या सुमारास नष्ट झाला आहे.