रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध दहाव्या दिवशीही सुरूच आहे. आता तर रशियाने युक्रेनमधील निवासी भागांतही हल्ले तीव्र केले आहेत. यातच, रशियाने झायटोमिर शहरात केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 47 नागरिक ठार झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तसेच, येथील स्थानिक पोलिसांनी, हा क्लस्टर बॉम्ब हल्ला होता, असे म्हटले आहे.
रशिया लष्करी तळांवर आणि नागरी भागांत सातत्याने हल्ले करत आहे, असे युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. यातच, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी, युरोपीय नेत्यांना रशियाला रोखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, 'रशियाला रोखले नाही, तर संपूर्ण युरोप नष्ट होईल,' असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
रशियाने आपल्या राष्ट्रपती भवनाजवळ हल्ला केला, युक्रेनचा दावा -यातच, रशियाने आपल्या राष्ट्रपती भवनाजवळ हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. मात्र, युक्रेनचा हा दावा रशियाने फेटाळून लावला आहे. व्लादिमीर पुतिन(Valdimir Putin) यांनी जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्ज यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला. यावेळी युक्रेनच्या शहरांवर रशियाने बॉम्बहल्ले केल्याचे त्यांनी नाकारले. तसेच, युक्रेन रशियाविरोधात अपप्रचार करत असल्याचेही रशियानने म्हटले आहे. असे वृत्त एएफपीने दिले आहे.
झेलेन्स्की यांनी नाटोवर टीका -याच बरोबर, युक्रेनला नो-फ्लाय झोन म्हणून घोषित न केल्याने व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाटोवर टीका केली आहे. तत्पूर्वी, झेलेन्स्की यांचा प्रस्ताव नाटोच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत फेटाळण्यात आला.